मेसीच्या गोलने अर्जेंटिनाचा विजय
By Admin | Updated: June 16, 2014 13:25 IST2014-06-16T06:20:24+5:302014-06-16T13:25:28+5:30
अर्जेंटिनाच्या लायनल मेसीने तब्बल आठ वर्षांनी फिफा विश्वचषकात गोल मारुन अर्जेंटिनाला बोस्नियाविरोधात २-१ असा विजय मिळवून दिला.

मेसीच्या गोलने अर्जेंटिनाचा विजय
>ऑनलाइन टीम
रिओ दी जानेरो, दि. १६- अर्जेंटिनाच्या लायनल मेसीने तब्बल आठ वर्षांनी फिफा विश्वचषकात गोल मारुन अर्जेंटिनाला बोस्नियाविरोधात २-१ असा विजय मिळवून दिला. मात्र विश्वचषकात दमदार पदार्पण करणा-या बोस्नियानेही अर्जेंटिनाला चांगलेच तंगवून 'हम भी किसी से कम नही' असा संदेशचे अन्य प्रतिस्पर्ध्यांना दिला.
फिफा वर्ल्डकपमध्ये फ गटात रविवारी अर्जेंटिना विरुद्ध बोस्निया यांच्यात सामना पार पडला. बोस्नियाचे हे पहिलेच वर्ल्डकप असल्याने अर्जेटिनाचे पारडे जड मानले जात होते. बोस्नियानेही अर्जेंटिनाचा स्टार फूटबॉलपटू लायनल मेसीभोवती 'फिल्डींग' लावली होती. मात्र अर्जेंटिनाच्या अन्य खेळाडूंनी बोस्नियाचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. बोस्नियाचा गोलकिपर सीद कोलासिनाकने सामन्याच्या तिस-यात मिनीटाला ओन गोल केला व अर्जेंटिनाला आघाडी मिळाली. यानंतर मात्र बोस्नियाचे खेळाडूंनी अर्जेंटिनाला गोलसाठी तब्बल ६२ मिनीटे तंगवून ठेवले होते. ६२ व्या मिनीटाला लायनल मेसीने दुसरा गोल मारुन अर्जेंटिनाला २-० अशी आघाडी मिळवली. यानंतर ८४ व्या मिनीटाला बोस्नियाच्या वेदाद इब्सिविकने गोल मारुन संघाच्या पाठराख्यांच्या मनात आशेचा किरण जागवला. मात्र त्यानंतर बोस्नियाला एकही गोल करता आला नाही व अर्जेंटिनाला विजय मिळाला.
आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये जर्मनीत पार पडलेल्या फिफा विश्वचषकात मेसीने सर्बियाविरोधात गोल केला होता. मात्र त्यांनतर त्याला वर्ल्डकपमध्ये एकही गोल करता न आल्याने त्याच्यावर टीका झाली होती.