मेस्सी मॅजिक चालणार का ?
By Admin | Updated: July 5, 2014 04:34 IST2014-07-05T04:34:48+5:302014-07-05T04:34:48+5:30
शनिवारी स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या बेल्जियमला अर्जेंटिना संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अर्जेंटिना संघाची भिस्त स्टार स्ट्रायकर लियोनल मेस्सीच्या कामगिरीवर अवलंबून आहे.

मेस्सी मॅजिक चालणार का ?
‘फन्टास्टिक फोर’कडून चमत्काराची आशा : अर्जेंटिनाची आज उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमशी झुंज
ब्रासिलिया : फिफा विश्वचषक स्पर्धेत उद्या, शनिवारी स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या बेल्जियमला अर्जेंटिना संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अर्जेंटिना संघाची भिस्त स्टार स्ट्रायकर लियोनल मेस्सीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. मेस्सीपासून प्रेरणा घेत अर्जेंटिना संघ पुढची फेरी गाठण्यास प्रयत्नशील आहे. या लढतीत विजय मिळविणारा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. अर्जेंटिनाने यापूर्वी १९८६ मध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यावेळी उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने बेल्जियमचा पराभव केला होता.
अर्जेंटिना संघाने या स्पर्धेत चार विजय मिळविले असले तरी संघाची भिस्त मेस्सीच्या कामगिरीवरच अवलंबून असल्याचे चित्र आहे. बार्सिलोनाच्या या स्टार खेळाडूने साखळी फेरीतील तीन सामन्यांत चार गोल नोंदवीत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडविरुद्ध अतिरिक्त वेळेपर्यंत खेळल्या गेलेल्या लढतीत अर्जेंटिनाने १-०ने विजय मिळविला. या लढतीतही केवळ मेस्सीची कामगिरी उभय संघांतील अंतर स्पष्ट करणारी ठरली.
डिएगो मॅराडोनाने संघाच्या कामगिरीवर टीका केली, तर प्रशिक्षक अलेजांद्रो साबेला यांनी मेस्सीवरील दडपण कमी झाले नाहीतर संघाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. विश्वकप स्पर्धेत अर्जेंटिना संघाला ‘फन्टास्टिक फोर’कडून चमकदार कामगिरीची आशा होती, पण केवळ मेस्सीचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली.
दुसऱ्या बाजूचा विचार करता बेल्जियम संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. १९८६ मध्ये बेल्जियम संघात आक्रमक एंजो सिफोचा समावेश होता. यावेळी ती भूमिका एडेन हजार्ड बजावित आहे. प्रशिक्षक मार्क विल्मोट््स म्हणाले, ‘हजार्डकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. ड्राइस मर्टेन्स व केव्हिन डी ब्रुयने प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविण्यास सक्षम आहेत.’ (वृत्तसंस्था)
...तर ‘मेस्सी’ला दोष देऊ नका : माराडोना
बेलो हॉरिझोंटे : विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना आपल्या क्षमतेप्रमाणे खेळ करीत नसून, ते मेस्सीवरच जास्त अवलंबून आहे. जर अर्जेंटिनाने बेल्जियमला पराभूत केले तर त्यांना पुढील लढतीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, असे मत अर्जेंटिनाचा महान खेळाडू दिएगो मारडोना याने व्यक्त केले आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेचे विश्लेषण केल्यास अर्जेंटिनाची कामगिरी खूपच सुमार झाल्याचे दिसते असे सांगून माराडोना म्हणाला,
‘मेस्सीवरच अवलंबून राहण्याचे धोरण त्यांनी सोडून दिले पाहिजे. तो ग्रेट गोल करू शकतो. मात्र, दुर्दैवाने त्याला गोल करण्यात अपयश आले तर त्याला दोष देणे चुकीचे ठरेल.’
मारडोना मागील विश्वचषक स्पर्धेत मारडोना अर्जेंटिनाचा प्रशिक्षक होता.अर्जेंटिनाने त्यावेळी उपांत्यफेरी गाठली होती. मारडोना म्हणाला,‘ अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू असलेला मेस्सी सध्या त्याच्या क्षमतेच्या फक्त ४० टक्केच खेळ करत आहे.’ स्वित्झर्लंडविरुध्दच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी अर्जेंटिनाला जादावेळेपर्यंत वाट पहावी लागली याबद्दलही मारडोना याने टीका केली. मारडोना म्हणाला,‘ सांघिक खेळ आणि ‘मॅन फॉर मॅन’ या मध्ये अर्जेंटिना नक्कीच सरस आहे. स्वित्झर्लंड चांगली घडाळे बनवू शकते मात्र त्यांच्याकडे खूपच कमी चांगले फुटबॉल पटू आहेत आणि ते वादग्रस्त आहेत.
रोड टू क्वार्टर फायनल
अर्जेंटिना
बोस्निया-हर्जेगोविनावर २-१ने मात,
इराणवर १-०ने मात,
नायजेरियावर ३-२ने मात,
स्वित्झर्लंडवर १-०ने मात.
बेल्जिअम
अल्जेरियावर २-१ने मात,
रशियावर १-०ने मात,
कोरियावर १-०ने मात,
अमेरिकेवर २-१ने मात.
2 वेळा विश्वचषकात आमने-सामने
> अर्जेंटिना विजयी : १ (१९८६च्या उपांत्य फेरीत २-०ने सरशी)
>बेल्जियम विजयी : १ (१९८२च्या गटसाखळी सामन्यात १-०ने सरशी)