पुरुष नेमबाजांचा कांस्यवरील निशाणा चुकला
By Admin | Updated: September 25, 2014 03:44 IST2014-09-25T03:44:47+5:302014-09-25T03:44:47+5:30
भारतीय पुरुष संघाचा २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात बुधवारी अटीतटीच्या लढतीत कांस्यपदकावरील निशाणा थोड्या फरकाने चुकला

पुरुष नेमबाजांचा कांस्यवरील निशाणा चुकला
इंचियोन : भारतीय पुरुष संघाचा २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात बुधवारी अटीतटीच्या लढतीत कांस्यपदकावरील निशाणा थोड्या फरकाने चुकला, तर महिला संघाला ५० मीटर रायफल प्रोन प्रकाराच्या अंतिम फेरीत निराशाजनक कामगिरीमुळे ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणे आशियाई स्पर्धेत नेमबाज पदकांची लयलूट करतील अशी आशा होती, परंतु पाचव्या दिवसालाही नेमबाजांना एकही पदक पटकावता आले नाही. महिला संघात समावेश असलेल्या राज चौधरी, लज्जा गोस्वामी आणि तेजस्विनी मुळे यांनी ५० मीटर
रायफल प्रोन प्रकारात निराशाजनक कामगिरी केली, तर वैयक्तिक
गटातही भारताची झोळी रिकामीच राहिली.
त्यानंतर पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात हरप्रीत सिंह, गुरप्रीत सिंह आणि पेंबा तेमांग या संघाला १७०४.३९ गुणांवर समाधान मानावे लागल्याने ते चौथ्या स्थानावर घसरले. व्हिएतनामच्या तान्ह मिन्ह हा, तू थान कियू आणि नाम क्वांग बुई या संघाने १७०४.४१ गुणांसह कांस्यपदक पटकावले. याव्यतिरिक्त वैयक्तिक गटात पुरुष खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. हरप्रीत पात्रता फेरीच्या दुसऱ्या राउंडमध्ये ९८.९७ आणि ९३ गुणांसह सातव्या स्थानावर घसरला. गुरप्रीत ५७.१३ आणि तमांग ५५६.१० गुणांसह अनुक्रमे १२ व्या व २०व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
याआधी झालेल्या महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन गटात भारतीय संघाने एकूण १,८२७ गुणांची कमाई केली आणि त्यांना ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताकडून राज चौधरीने ६१४.६ , गोस्वामीने ६१३.७ आणि मुळेने ६०८.८ गुणांची कमाई केली. वैयक्तिक गटात राज चौधरी, लज्जा गोस्वामी आणि तेजस्विनी मुळे यांना अनुक्रमे २२, २५ व ३६वे स्थान मिळाले. (वृत्तसंस्था)