ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - भारताच्या अंडर-१७ फुटबॉल संघासाठी प्रशिक्षकाचा शोध सुरू असून त्यासाठी भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) समितीची स्थापना केली. समितीच्या एका सदस्याने टीका केली असली तरी एआयएफएफने गुरुवारी समितीच्या सर्व सदस्यांना पोर्तुगालच्या लुई नोर्टन डी मातोस यांची भेट घेण्यास सांगितले आहे. प्रशिक्षक पदासाठी मातोस पहिल्या पसंतीचे उमेदवार ठरले आहेत.
एआयएफएफचे महासचिव कुशाल दास यांनी समितीच्या सर्व सदस्यांना मातोस यांची भेट घेण्यास सांगितले. मातोस २८ फेब्रुवारी रोजी भारतात येण्याची शक्यता आहे.भारतीय संघ फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. विश्वकप स्पर्धेतील लढती ६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत भारतातील सहा शहरांमध्ये खेळल्या जाणार आहेत.
दास म्हणाले,‘सल्लागार समितीला लुई मोर्टन यांची भेट घेण्याची सूचना देण्यात आली आहे.’ या समितीमध्ये भारताचा माजी दिग्गज फुटबॉलपटू बाईचुंग भुतिया, आय.एम. विजयन, एक अन्य माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिषेक यादव (अंडर-१७ संघाचे मुख्य संचालन अधिकारी )आणि एआयएफएफचे तांत्रिक संचालक सॅव्हियो मॅडिरा यांचा समावेश आहे.