नवी दिल्ली : पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतातील ८ शहरांमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. स्पर्धेतील सामने बंगळुरू, चेन्नई, धर्मशाला, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता येथे होतील. चार वर्षांपूर्वी भारतात आयोजित वन-डे विश्वकप स्पर्धेदरम्यान कोलकात्यामध्ये एकही मोठा सामना आयोजित करण्यात आलेला नव्हता. भारत आणि इंग्लंड संघांदरम्यानची लढत बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळली गेली होती. कारण, ईडन गार्डन्सवरील डागडुजीचे काम पूर्ण झाले नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले होते. त्याआधी, ईडन गार्डन्सवर १९८७मध्ये रिलायन्स कप फायनल व १९९६मध्ये विश्वकप सेमी फायनल या लढतींचे आयोजन करण्यात आले होते. निवड करण्यात आलेल्या स्थळांनी अटींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. बीसीसीआयने म्हटले आहे, की ‘आयसीसी व बीसीसीआय यांनी ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता झाली, तरच या स्थळांवर सामने होतील.’भारतात टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन प्रथमच होत आहे. २००७मध्ये प्रथमच टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताने सहभाग नोंदवताना जेतेपद पटकावले होते. स्पर्धेबाबत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘आम्हाला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद झाला. आम्ही स्थळांची घोषणा करताना स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. आम्ही ही स्पर्धा सहभागी संघांसाठी व प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरविण्यास प्रयत्नशील आहोत.’’बीसीसीआयने स्पर्धेसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून, तीत अध्यक्ष दालमिया व समन्वयक ठाकूर असतील. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये सहसचिव अमिताभ चौधरी, कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी, उपाध्यक्ष गंगा राजू, आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला, मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आशिष शेलार आणि ओडिशा क्रिकेट संघटनेचे सचिव आशीर्वाद बेहेडा यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
मुंबई-नागपूरमध्ये होणार सामने
By admin | Updated: July 21, 2015 23:49 IST