मॅच फिक्सरांच्या कुरापती सुरुच
By Admin | Updated: May 23, 2014 10:08 IST2014-05-23T01:58:16+5:302014-05-23T10:08:34+5:30
इंडियन प्रीमिअर लीगच्या चालू सत्रात सट्टेबाजांनी दोन खेळाडूंशी संपर्क साधला होता असा गौप्यस्फोट आयपीएलचे अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर यांनी केला आहे़

मॅच फिक्सरांच्या कुरापती सुरुच
कोलकाता : इंडियन प्रीमिअर लीगच्या चालू सत्रात सट्टेबाजांनी दोन खेळाडूंशी संपर्क साधला होता असा गौप्यस्फोट आयपीएलचे अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर यांनी केला आहे़ या प्रकरणी ‘आयसीसी’च्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला माहिती देण्यात आली आहे, असेही गावसकर यांनी सांगितले आहे़ गावसकर यांनी पुढे सांगितले की, चालू सत्रात दोन वेळा सट्टेबाजांनी खेळाडूंशी संपर्क साधल्याच्या घटना समोर आल्या आहे़ या प्रकरणाचा अहवाल भ्रष्टाचारविरोधी पथकाला सोपविण्यात आला आहे़ त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे़ आयपीएलच्या चालू सत्रात प्रत्येक संघासोबत एक तपास अधिकारी ठेवण्यात आला आहे़ अशावेळी एखाद्या सट्टेबाजाने खेळाडूशी संपर्क साधल्यास त्वरित याची माहिती सदर अधिकार्याला दिली जाते़ अशीही माहिती गावसकर यांनी दिली आहे़ पैसा आणि प्रसिद्धीसाठी खेळाडू फिक्सिंग किंवा अन्य गैरव्यवहार करू नये यासाठी अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर आणि आयपीएल संचालन परिषदेमधील त्यांचे सहकारी युवा आणि प्रतिभावंत क्रिकेटपटूंच्या मदतीसाठी विस्तृत योजना तयार करीत आहेत़ (वृत्तसंस्था) या संदर्भात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही़व्ही़एस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे यांच्याशी चर्चा झाली आहे़ असेही गावसकर म्हणाले़ ते पुढे म्हणाले, सचिन, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे हे चारही महान खेळाडू आहेत़ त्यांनी मैदानावर दबाव, तणाव अशा परिस्थितीचा सामना केला आहे़ त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर युवा खेळाडूंना आपली कारकीर्द पुढे कशी वाढवावी हे सांगण्याची अत्यंत गरज असल्याचे लक्षात आले आहे़ खेळाचा स्तर उंचावण्यासाठी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड या सारख्या दिग्गज खेळाडूंचा कसा उपयोग करून घ्यायचा याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ विचार करीत आहे़ या खेळाडूंचा नक्कीच युवा क्रिकेटपटूंना लाभ होईल, असा विश्वासही गावसकर यांनी व्यक्त केला़ (वृत्तसंस्था)