मशरफी मोर्तझाने टी२० क्रिकेटतून निवृत्ती घेतली
By Admin | Updated: April 5, 2017 00:19 IST2017-04-05T00:19:00+5:302017-04-05T00:19:00+5:30
कर्णधार मशरफी मोर्तझा याने अचानकपणे टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे फेसबुकवर मेसेज करुन सर्वांना धक्का दिला.

मशरफी मोर्तझाने टी२० क्रिकेटतून निवृत्ती घेतली
कोलंबो : बांगलादेशच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार मशरफी मोर्तझा याने अचानकपणे टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे फेसबुकवर मेसेज करुन सर्वांना धक्का दिला. श्रीलंकाविरुध्दच्या दोन सामन्यांच्या टी२० मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे मोर्तझाने जाहीर केले.
येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये यजमान श्रीलंकेविरुध्दच्या पहिल्या सामन्याच्या पुर्वसंध्येला मोर्तझाने ही घोषणा केली.
मोर्तझाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर लिहिले की, ‘१० वर्षांहून अधिक वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब ठरली. माझ्या मते सध्याचा संघ अत्यंत समतोल आहे. संघात अनेक गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे टी२० प्रकारातून निवृत्त होण्याची ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे. यामुळे युवा खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळेल.’ मोर्तझाने बांगलादेशकडून ५२ टी२० सामने खेळताना त्याने ८.०५च्या धावगतीने ३९ बळी घेतले. ४ बाद १९ धावा ही त्याची टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. (वृत्तसंस्था)