Mary Kom's winning start; Nepal's Mala Rai defeated | मेरीकोमची विजयी सुरुवात; नेपाळच्या माला रायचा पराभव
मेरीकोमची विजयी सुरुवात; नेपाळच्या माला रायचा पराभव

गुवाहाटी : नव्या वजनी गटातून खेळताना भारताची स्टार बॉक्सर एम. सी. मेरीकोम हिने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत विजयी सुरुवात करताना नेपाळच्या माला रायचा पराभव केला. यासह स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना मेरीकोमने आपले पदकही पक्के केले. दुसरीकडे, हरियाणाचा युवा बॉक्सर पवन नारवालने ६९ किलो वजन गटता युवा आॅलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता ब्रायन अरेगुई आगस्टीनचा पराभव करीत पुरुष विभागात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.


सहावेळची विश्वविजेती असलेल्या मेरीकोमने मालाचा सहज पराभव करताना ५१ किलो वजनी गटातून ५-० अशी धमाकेदार विजयी सलामी दिली. आगामी आॅलिम्पिकमध्ये ४८ किलो वजनी गटाचा समावेश नसल्याने मेरीकोमने ५१ किलोवजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मेरीकोमच्या दमदार खेळापुढे निभाव न लागल्यानंतरही मालाने सामना संपल्यानंतर हसऱ्या चेहºयाने मेरीकोमला शुभेच्छा दिल्या.
अन्य एका लढतीत माजी विश्वविजेत्या सरिता देवीने ६० किलो वजनी गटात प्रीती बेनीवालचा ५-० असा धुव्वा उडवत सहजपणे उपांत्य फेरी गाठली. तिनेही या विजयासह आपले पदक निश्चित केले.


अर्जेंटिनाच्या ब्रायनने पहिल्या फेरीत वर्चस्व गाजवले, पण २१ वर्षीय पवनने दमदार पुनरागमन करीत खंडित निर्णयामध्ये ४-१ ने बाजी मारली. पवनची यानंतरची लढत मॉरिशसच्या क्लेयर मार्व्हनसोबत होईल.


६९ किलो गटात दिनेश डागरने फिलिपाइन्सच्या मर्जोन अंगकोन पियानारचा ३-२ ने पराभव करीत आगेकूच केली. यूथ आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता अंकित खटानाने (६० किलो) फिलिपाइन्सच्या रियान इंपोक मोरेनोचा पराभव केला.


Web Title: Mary Kom's winning start; Nepal's Mala Rai defeated
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.