मेरी कोमचा 'गोल्डन' पंच
By Admin | Updated: October 1, 2014 15:16 IST2014-10-01T11:50:25+5:302014-10-01T15:16:20+5:30
मेरी कॉमने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत कझाकिस्तनच्या खेळाडूचा पराभव करत 'सुवर्ण' पदकाची कमाई केली आहे.

मेरी कोमचा 'गोल्डन' पंच
ऑनलाइन लोकमत
इंचियोन, दि. १ - भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवत 'सुवर्ण' पदकाची कमाई केली आहे. स्पर्धेदरम्यान कामगिरीत सातत्य राखणा-या मेरीने ५१ किलो वजनी गटात कझाकिस्तनच्या झैना शेखरबेकोव्हाच्या पराभव करत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले. मेरी कोमच्या या विजयामुळे भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत सातवे सुवर्ण पदक मिळाले असून आता भारताच्या खात्यात ८ रौप्य, ३२ कांस्य अशी एकूण ४७ पदके आहेत. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी मेरीने व्हिएतनामच्या लर थी बँगचा ३-० असा पराभव केला होता.
सेलिब्रिटींचा मेरीवर अभिनंदनाचा वर्षाव
मेरी कोमने पटकावलेल्या 'सुवर्ण' पदकानंतर अनेक सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन केले आहे. नुकतीच मेरीच्या जीवनावर आधारित चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने मेरीचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'मला तुझा खूप अभिमान वाटतो, तू खरी चॅम्पियन आहेस,' असे ट्विट प्रियांकाने केले आहे. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ट्विटरवरून मेरीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'आपल्या देशातील महिला बॉक्सर मेरी कोम यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. या यशासाठी माझ्याकडून त्यांना खूप शुभेच्छा' असे ट्विट त्यांनी केले आहे. याशिवाय अभिनेत्री दिया मिर्झा, कुणाल कोहली यांनीही मेरीचे अभिनंदन केले आहे.