Mary Kom Divorce: ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॉक्सर एमसी मेरी कोमने आज अखेर आपल्या घटस्फोटाची पुष्टी केली आहे. मेरी कोमने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पती करुंग ओंखोलरसोबत घटस्फोट घेतल्याचे सांगितले. तसचे, दुसऱ्या पुरुषासोबतच्या प्रेमसंबंधांबद्दल सुरू असलेल्या चर्चेवरही मौन सोडले.
मेरी कोमने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिच्या वकिलाचे अधिकृत निवेदनात शेअर केले आहे. त्यात म्हटले आहे की, मेरी कॉमने 30 डिसेंबर 2023 रोजी तिच्या पतीपासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आहे. मेरी कोमने आता आपल्या घटस्फोटाची माहिती देण्याचे कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून मेरी कॉमच्या प्रेमसंबंधाच्या अफवा पसरत आहेत.
मेरीचे व्यावसायिक सहकारी हितेश चौधरीसोबत संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पण, मेरीने हे दावे फेटाळून लावले आहेत. तिचे कोणासोबतही विवाहबाह्य संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच, परस्पर संमतीनेच पतीपासून घटस्फोट घेतल्याचेही मेरीने स्पष्ट केले. याशिवाय, तिने माध्यमांना विनंती केली की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू आणि तिच्या नात्यांबद्दलच्या अफवा प्रकाशित करू नये.