Manu Bhaker medal News, Paris Olympics 2024: भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये दोन कांस्य पदके जिंकून इतिहास रचला. पण आता या पदकांची चमक कमी होऊ लागली आहे. मनू भाकरसह काहींनी पदकांचा रंग फिका पडला असल्याची तक्रार केली आहे. या बाबीची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOC) देखील एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आयओसीने म्हटले आहे की ते लवकरच ही सर्व पदके बदलून देतील. तसेच, ज्या खेळाडूंच्या पदकाचा रंग फिका पडला आहे फिकट झाली आहेत त्यांना नवीन पदके दिली जातील.
मनू भाकरने यापूर्वी पॅरिस ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूलमध्ये पदक जिंकून पोडियमवर स्थान मिळवले होते. यानंतर, सरबजोत सिंगसोबत तिने १० मीटर मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्यपदक जिंकले होते. पदकाचा रंग फिकट होत असल्याची तक्रार करणारी मनु भाकर ही एकमेव नाही. आतापर्यंत, जगभरातील १०० हून अधिक खेळाडूंनी त्यांच्या पदकांचा रंग फिकट होत असल्याची तक्रार केली आहे. ही माहिती फ्रेंच ऑनलाइन मीडिया आउटलेट ला लेट्रेने दिली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने म्हटले आहे की, सर्व खेळाडूंना पदके बदलून दिली जातील.
ऑगस्टपासून प्रक्रिया सुरु
हे पदक मोनाई डी पॅरिस नावाच्या संस्थेने तयार केले आहे. या संघटनेच्या प्रवक्त्याने त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की पदके 'दोषपूर्ण' नाहीत. बहुतेक पदकांचा रंग आता उडाला आहे. आम्ही अशा पदकांना रिप्लेस करणार आहोत. पदके बदलण्याचे काम ऑगस्टपासून सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहील.
आयफेल टॉवरच्या लोखंडापासून पदके
पॅरिस ऑलिंपिकमधील सर्व पदके एका खास पद्धतीने बनवण्यात आली होती. ही पदके ऐतिहासिक आयफेल टॉवरच्या लोखंडी तुकड्यांपासून बनवण्यात आली होती. पदकाच्या वरच्या भागात सुमारे १८ ग्रॅम लोखंडापासून एक षटकोन बनवण्यात आला होता. पदकाच्या वरच्या भागात आयफेल टॉवरचा आकार बनवण्यात आला होता. जेव्हा आयफेल टॉवरची शेवटची दुरुस्ती करण्यात आली होती, तेव्हा त्यातून अनेक लोखंडी तुकडे काढण्यात आले होते. यापासून ही पदके बनवली गेली होती.