मनोहर आयसीसीच्या चेअरमनपदी
By Admin | Updated: November 9, 2015 23:46 IST2015-11-09T23:46:43+5:302015-11-09T23:46:43+5:30
बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांची अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत एन्ट्री झाली. बीसीसीआयने मुंबईत झालेल्या आपल्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीमध्ये श्रीनिवासन यांच्या जागी मनोहर

मनोहर आयसीसीच्या चेअरमनपदी
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांची अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) एन्ट्री झाली. बीसीसीआयने मुंबईत झालेल्या आपल्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीमध्ये एन. श्रीनिवासन यांच्या जागी मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड केली. त्याचवेळी राष्ट्रीय निवड समितीमध्येही बीसीसीआयने दोन महत्त्वाचे बदल केले.
सोमवारी मुंबई येथे झालेल्या ८६ व्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत (एजीएम) बीसीसीआयने आयसीसीच्या चेअरमनपदी मनोहर यांची निवड करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. पुढील वर्षी जून २०१६ पर्यंत मनोहर या पदावर कार्यरत राहतील. विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष आणि बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची बदली संचालक म्हणून निवड करण्यात आली. यानुसार मनोहर यांच्या अनुपस्थितीत आयसीसीच्या बैठकीत पवार भारताचे प्रतिनिधित्व करतील.
त्याचवेळी बीसीसीआयने राष्ट्रीय निवड समितीमध्येही मोठे बदल करताना रॉजर बिन्नी आणि राजिंदरसिंग यांना समितीबाहेर ठेवले. दक्षिण विभागाचे सदस्य म्हणून बिन्नी यांच्या जागी भारताचे माजी यष्टिरक्षक एमएसके प्रसाद यांची निवड झाली, तर मध्य विभागामधून राजिंदरसिंग यांच्या जागी गगन खोडा यांची निवड करण्यात आली, तसेच भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक व्यंकटेश प्रसाद यांना ज्युनियर संघ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.
सध्या बीसीसीआयमध्ये विविध वादांमध्ये अडकलेल्या रवी शास्त्री यांनाही धक्का बसला आहे. सध्या टीम इंडियाचे संचालक असलेले शास्त्री यांना आयपीएलच्या संचालन परिषदेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. पुढील वर्षी भारतात मार्च ते एप्रिलदरम्यान होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत शास्त्री टीम इंडियाचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडतील.
(क्रीडा प्रतिनिधी)
भारत-पाक मालिकेचा निर्णय केंद्र सरकारवर अवलंबून : मनोहर
आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या भारत - पाकिस्तान मालिकेची शक्यता धूसर असताना बीसीसीआयने मात्र अजूनही या मालिकेच्या आयोजनाच्या आशा पूर्णपणे मावळल्या नसल्याचे स्पष्ट केले.
डिसेंबरमध्ये भारतीय संघ कोणतीही मालिका खेळणार नाही, याकडे लक्ष वेधल्यानंतर बीसीसीआयने सांगितले, की या महिन्यातील वेळापत्रक हे सर्व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेवर अवलंबून असेल.
पाकविरुद्धच्या मालिकेच्या आयोजनासाठी आम्हाला केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता असून त्यानुसारच बीसीसीआयचा निर्णय अवलंबून आहे.
जर केंद्र सरकारने पाकविरुद्धच्या मालिकेचा निर्णय सकारात्मक घेतला तर बीसीसीआय या मालिकेसाठी केंव्हाही तयार आहे, असे शशांक मनोहर यांनी सांगितले.गांगुली तांत्रिक समितीप्रमुख
बीसीआयने आपल्या तांत्रिक समितीमध्येही बदल केले. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्या जागी भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांची तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच पीएस रमन यांच्याकडे कायदा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
न्या. ए. पी. शाह ‘लोकपाल’
बीसीसीआयने आपल्या बैठकीत हितसंबंध जोपासण्यासंदर्भातील नियम आणखी कडक केला आहे. शशांक मनोहर यांनी बीसीसीआयची प्रतिमा सुधारण्यास सुरुवात केली असून यासाठी त्यांनी निवृत्त न्यायाधीश ए. पी. शाह यांची नियुक्ती केली आहे. यानुसार शाह यापुढे हितसंबंध जोपसण्यासंदर्भातील तक्रारींकडे लक्ष देतील.
आयपीएलमध्ये शुक्ला कायम
आयपीएलच्या संचालन परिषदेचे अध्यक्षपद राजीव शुक्ला यांच्याकडे कायम ठेवण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, अजय शिर्के, एमपी पांडोव आणि सौरभ गांगुली यांचा समावेश आहे.
...अन्यथा सामना पुणे येथे खेळविणार
सध्या सुरू असलेल्या भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना दिल्ली येथे खेळविण्यात येणार आहे. यासाठी बीसीसीआयने फिरोजशाह कोटला मैदान तयार करण्यासाठी डीडीसीएला १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अंतर्गत वादामुळे सध्या डीडीसीएवर हा कसोटी सामना खेळविण्यावरून संभ्रम निर्माण झाले आहेत. यासाठी बीसीसीआयने डीडीसीएला अंतिम मुदत देताना सांगितले, की जर दिलेल्या वेळेत मैदान तयार झाले नाही, तर हा सामना पुणे येथे खेळविण्यात येईल.
निवड समितीचे ‘कर्णधार’पद पाटील यांच्याकडेच
पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजनाकडे पाहून बीसीसीआयने माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनाच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी साबा करीम आणि विक्रम राठोड यांनाही कायम ठेवण्यात आले आहे
या मैदानांना कसोटी दर्जा
बीसीसीआयने आपल्या बैठकीत सहा स्टेडियम्सना कसोटी दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये पुणे,
रांची, इंदोर, राजकोट, विशाखापट्टणम आणि धर्मशाळा यांचा समावेश
आहे..