मनिष पांडेच्या शतकाच्या बळावर भारताने जिंकला शेवटचा सामना

By Admin | Updated: January 23, 2016 18:54 IST2016-01-23T16:52:02+5:302016-01-23T18:54:44+5:30

रोहित शर्माच्या ९९ धावा आणि मनिष पांडेचे नाबाद शतक यांच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या दोन चेंडू आणि ६ गडी राखत पराभव केला

Manish Pandey's century helped India win the last match | मनिष पांडेच्या शतकाच्या बळावर भारताने जिंकला शेवटचा सामना

मनिष पांडेच्या शतकाच्या बळावर भारताने जिंकला शेवटचा सामना

ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २३ - रोहित शर्माच्या ९९ धावा आणि मनिष पांडेचे नाबाद शतक यांच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या दोन चेंडू आणि ६ गडी राखत पराभव केला आणि दौरा संपता संपता काही प्रमाणात लाज राखली. भारताने ही मालिका १ - ४ अशी गमावली आहे.
मनिष पांडेने ८१ चेंडूंमध्ये नाबाद १०४ धावा केल्या तर कर्णधार धोनीने ४२ चेंडूंमध्ये ३४ धावांची उपयुक्त खेळी केली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताला विजयासाठी ६ चेंडूंमध्ये ७ धावा हव्या होत्या. या मोक्याच्या क्षणी पांडेने एक चौकार लगावत लक्ष्य समीप आणले नी अखेर २ चेंडू राखत भारताने सामना जिंकला.
पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी ३३१ धावांचे आव्हान उभे केले होते. डेव्हिड वॉर्नर (१२२) आणि मायकेल मार्श (नाबाद १०२) यांच्या झुंजार शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ७ गडी गमावून ३३० धावा केल्या. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या भारताचा गोलंदाज जसप्रित भुमरा तसेच इशांत शर्माने प्रत्येकी २ तर उमेश यादव व ऋषी धवनने प्रत्येकी १ बळी टिपला.
नाणफेक जिंकून भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकांत अॅरॉन फिंचचा (६) बली मिळाल्याने तो यशस्वी ठरल्याचे दिसले. मात्र त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने चिवटपणे फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. एकीकडे कर्णधार स्मिथसह(२८) ऑस्ट्रेलियाचे जॉर्ज बेली (६), शॉन मार्श (७), मॅथ्यू वेड (३६), फॉकनर (१) पटापट तंबूत परतले, मात्र वॉर्नर आणि त्याच्यानंतर मायकेल मार्शने टिच्चून फलंदाजी करत झुंजार शतके ठोठावली. एकदिवसीय सामन्यातील मार्शचे हे पहिलेच शतक असून त्याच्या नाबाद १०२ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने एकूण ३३० धावांचा टप्पा गाठला.
अनेक दिग्गजांनी ट्विटरच्या माध्यमातून मनिष पांडेचं कौतुक केलं व त्याला शुभेच्छा दिल्या.