ब्रीजभूषण सिंग प्रकरणावरून दिल्लीत 'दंगल' सुरू असताना दुसरीकडे मणिपूरमध्येही ऑलिम्पियन खेळाडूंनी सरकारला इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये अशांतता आहे आणि तिथले वातावरण भयभीत झाले आहे. अशात आता मणिपूरमधील खेळाडूंनी एकत्र येऊन गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवलं आहे. या खेळाडूंमध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मिराबाई चानू हिच्यासह अनेक ऑलिम्पियनपटूंचा समावेश आहे. या सर्वांनी स्वाक्षरी केलेल्या ता पत्रात त्यांनी राज्यातील परिस्थिती लवकरच सुधारली नाही, कष्टाने मिळवलेले सन्मान आणि पदके परत करावी लागतील असा इशारा दिला आहे.
प्रसिद्ध वेटलिफ्टर कुंजरानी देवी, भारतीय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार बेम बेम देवी आणि बॉक्सर एल सरिता देवी यांच्यासह या प्रतिष्ठित खेळाडूंनी त्यांच्या चिंता पत्रात मांडल्या आणि सादर केलेल्या निवेदनात त्वरित कारवाईची मागणी केली. त्यांची मुख्य मागणी राष्ट्रीय महामार्ग-2 पुन्हा सुरू करण्याची आहे, जो काही आठवड्यांपासून बंद आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत असताना आवश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
मणिपूरची अखंडता आणि एकता टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावरही या निवेदनात भर देण्यात आला आहे, राज्याच्या विघटनाची कोणतीही मागणी नाकारण्यात आली आहे. खेळाडूंनी मितेई समुदायाला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता देखील वाढवली, ज्यांना सध्या मणिपूरच्या केवळ 10% प्रदेशात स्थायिक होण्याची परवानगी आहे.