केदार लेले, लंडनइंग्लिश प्रिमियर लीगमध्ये मंगळवारी झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने निर्णायक ठरले. अनुक्रमे मँचेस्टर युनायटेड संघाने स्टोक सिटीवर २-१ने, लिव्हरपूलने लेस्टर सिटीवर ३-१ने, स्वान्सीने क़्युपीआरवर २-०ने, वेस्ट हॅमने वेस्ट ब्रॉमवर २-१ने आणि अॅस्टन व्हिलाने क्रिस्टल पॅलेसवर १-० ने विजय मिळवले. बर्नली आणि न्यूकॅसल यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली.मँचेस्टर युनायटेड विरुद्ध स्टोक सिटी जखमी स्ट्रायकर-कप्तान वेन रूनी आणि डी. मारिया यांची अनुपस्थिती मँचेस्टर युनायटेडला चांगलीच जाणवली. जखमी स्टार खेळाडू विरहीत खेळणाऱ्या मँचेस्टर युनायटेड संघाने संथ आणि संयमी सुरुवात केली.सामन्याच्या (२१व्या मिनिटालाच) हरेराच्या उत्कृष्ट पासवर फेलेनीने हेडरद्वारा गोल करून मँचेस्टर युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण युनायटेडचा संघ ही आघाडी टिकवू शकला नाही. (३९व्या मिनिटाला) स्टीवन नॉन्झीने २० यार्डांवरून मारलेला अप्रतिम फटका थेट ‘गोलपोस्ट’ मध्येच विसावला आणि स्टोकने युनायटेड विरुद्ध बरोबरी साधली; ज्यामुळे पूर्वार्धात युनायटेड आणि स्टोक सिटी यांच्यात १-१ अशी बरोबरी राहिली.उत्तरार्धात मात्र युनायटेडचा संघ विजय मिळवण्याच्या जिद्दीने खेळताना दिसला. युआन मॅटा याने (५९व्या मिनिटाला) गोल डागत आक्रमक मँचेस्टर युनायटेडला २-१ अशी निसटती आघाडी मिळवून दिली! हीच आघाडी निर्णायक ठरली आणि स्टोक सिटी विरुद्ध मँचेस्टर युनायटेड संघाने विजयाचे तीन गुण वसूल केले!
मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, स्वान्सी संघ विजयी
By admin | Updated: December 4, 2014 01:45 IST