मुंबईसाठी ‘करा किंवा मरा’
By Admin | Updated: May 21, 2016 12:33 IST2016-05-21T04:51:45+5:302016-05-21T12:33:11+5:30
गुजरात लॉयन्स संघ ग्रीनपार्कच्या परिस्थितीचा लाभ घेत आज शनिवारी मुंबई इंडियन्सवर विजयासह पहिल्या दोन संघात स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने उतरणार

मुंबईसाठी ‘करा किंवा मरा’
कानपूर : कोलकाता नाईट रायडर्सला नमवित प्ले आॅफच्या जवळ पोहोचलेला गुजरात लॉयन्स संघ ग्रीनपार्कच्या परिस्थितीचा लाभ घेत आज शनिवारी मुंबई इंडियन्सवर विजयासह पहिल्या दोन संघात स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. दुसरीकडे मुंबईसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा असेल. विजयामुळे प्ले आॅफच्या आशा जिवंत राहतील .
केकेआरवरील सहा गड्यांनी मिळविलेल्या विजयामुळे गुजरातच्या अंतिम चार संघात स्थान मिळविण्याची आशा पल्लवित झाली. गुजरातचे १३ सामन्यात ८ विजयासह १६ गुण असून हैदराबादपाठोपाठ हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातचा आजचा विजय म्हणजे पहिल्या दोन संघात स्थाननिश्चिती असा असेल. पराभूत झाल्यास मात्र परिस्थिती नाजूक होईल. या संघाची धावसरासरी खराब आहे. मुंबईला विजय मिळाला तरच प्ले आॅफची आशा बाळगता येईल. १३ सामन्यात सात विजयासह संघाचे १४ गुण असून धावसरासरी उणे ०८२ इतकी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईला अंतिम चार संघात स्थान पटकवायचे झाल्यास हा सामना जिंकावाच लागेल.
गुजरात लॉयन्सने ग्रीनपार्कची स्थिती ओळखली आहे. त्यांच्या गोलंदाजांनी केकेआरविरुद्ध विजय सोपा केला.
मुंबई संघ येथे दाखल झाला. भीषण उकाड्याचा सामना मुंबईचे खेळाडू कसा करतील यावर सामन्यात प्रभावी कामगिरी विसंबून राहील. याआधी दिल्लीवर मोठ्या विजयामुळे मुंबई संघात उत्साह आहे. कृणाल पांड्या याने फलंदाजी आणि गोलंदाजीत चुणूक दाखविली होती. मार्टिन गुप्तिल, किरोन पोलार्ड, जोस बटलर, अंबाती रायुडू हे चांगले फलंदाज तसेच मिशेल मॅक्लेनगन, जसप्रित बुमराह आणि अनुभवी हरभजनसिंगसारखे गुणी फलंदाज आहेत. मुंबई संघाची जादू चालल्यास कुणालाही पराभूत करण्याची ताकद या संघात आहे. (वृत्तसंस्था)
>उभय संघ
यातून निवडणार
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लेनघन, अक्षय वाखारे, नितीश राणा,
हार्दिक पंड्या, जगदीश सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या, मार्टिन गुप्टिल व जितेश शर्मा.
गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉल्कनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.