ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - अॅडलेडवरील कसोटीत पहिल्यांदाच कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दोन्ही डावात शानदार शतक ठोठावणा-या विराट कोहलीकडेच पूर्णवेळ कर्णधारपद देण्यात यावे असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी एका लेखात व्यक्त केले आहे.
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या अनुपस्थितीत कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्याने ही जबाबदारी यशस्वीरित्या तर सांभाळलीच आणि कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावत भारताला विजयाच्या समीप नेले. मात्र भारताला हा सामना जिंकण्यात अपयश आले. भारतीय संघ या कसोटीत जिद्दीने लढताना दिसला, त्यामुळे जरी आपण हा सामना हरलो असलो तरी प्रेक्षकांची मनं भारतीय संघाने जिंकली. आणि त्याचं श्रेय टीम इंडियाचा तात्पुरता कर्णधार विराट कोहलीला दिलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर चॅपेल यांनी हे मत व्यक्त केले आहे.
धोनीकडून कोहलीकडेच कर्णधारपदाची सूत्रं देण्याची हीच योग्य वेल असल्याचे चॅपेल यांनी म्हटले आहे. पहिल्या कसोटीत कोहलीने जे नेतृत्वगुण दाखवले आहेत, ते ओळखून निवड समितीने त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिली पाहिजे. त्याची शारिरीक क्षमता उत्तम आहे, त्याच्या खेळीने प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. त्याने गोलंदाजांनाही योग्यपद्धतीने वापरून घेतले आहे. त्याच्यामध्ये पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारण्याची क्षमता आहे, असे चॅपेल यांनी म्हटले आहे. मात्र असे असले तरी कर्णधारपदावर असताना रागावर नियंत्रण ठेवणं, डोक शांत ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि कोहली त्यात अजूनही थोडा कमी पडतोय असेही चॅपेल यांनी लेखात नमूद केले आहे.