महात्मा गांधी संघाचे दुहेरी विजेतेपद
By Admin | Updated: May 6, 2015 02:45 IST2015-05-06T02:45:39+5:302015-05-06T02:45:39+5:30
बलाढ्य महात्मा गांधी स्पोटर््स क्लबने ३४व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना अनुक्रमे किशोरी व कुमारी गटाचे शानदार विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट पटकावले.

महात्मा गांधी संघाचे दुहेरी विजेतेपद
मुंबई : बलाढ्य महात्मा गांधी स्पोटर््स क्लबने ३४व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना अनुक्रमे किशोरी व कुमारी गटाचे शानदार विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट पटकावले. त्याचवेळी किशोर गटात गोरेगावच्या सह्याद्री क्रीडा मंडळ तर कुमार गटात गोरेगावच्याच गोकुळवन क्रीडा मंडळाने बाजी मारली.
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत महात्मा गांधी संघाने किशोरी गटाच्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळाचा ४३-३९ असा पाडाव केला. ग्रंथाली हांडे आणि तेजस्विनी गिलबिले यांनी जबरदस्त आक्रमण करताना महात्मा गांधीच्या विजेतेपदात निर्णायक कामगिरी केली.
कुमारी गटात देखील महात्मा गांधी संघाने आपला दबदबा राखला. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात महात्मा फुले संघ्हाचा ५७-१९ असा फडशा पाडून महात्मा गांधी संघाने दिमाखात विजेतेपद पटकावले. सायली जाधव, तृप्ती सोनावणे यांच्या जोरावर महात्मा गांधी संघाने विजेतेपद उंचावले. त्याचवेळी प्रगती कणसेने पराभूत संघाकडून एकाकी झुंज
दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
किशोर गटामध्ये अटीतटीच्या लढती
दुसऱ्या बाजूला किशोर गटामध्ये सह्याद्री क्रीडा मंडळाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भरत कनगुटकर व चैतन्य नकाशेच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर चुनाभट्टीच्या दत्तात्रय सेवा संघाचा ६०-५२ पराभव केला आणि विजेतेपदावर नाव कोरले.
कुमार गटात गोकुळवन क्रीडा मंडळाने जोगेश्वरी स्फूर्ती क्रीडा
मंडळाचे कडवे आव्हान ३०-१६ असे परतावून लावले आणि विजय मिळवला.