भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राची धुरा
By Admin | Updated: May 5, 2015 00:39 IST2015-05-05T00:39:09+5:302015-05-05T00:39:09+5:30
भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्याची भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राची धुरा
मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्याची भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ८ ते २४ मेदरम्यान रंगणाऱ्या आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सब ज्युनियर मुलींच्या १५ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली.
नुकत्याच काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या एएफसी अजिंक्यपद स्पर्धेत भाग्यश्रीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर ती संघासोबत मायदेशी परतली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या २० सदस्यांच्या संघात मुंबईच्या ५ आणि ठाणेच्या ६ खेळाडूंचा समावेश आहे.
महाराष्ट्राचा स्पर्धेत ‘ई’ गटात समावेश असून, या गटात संघासमोर आव्हान असेल ते कसलेल्या सिक्कीम व उत्तराखंडचे. ९ मेला महाराष्ट्राचा सलामीचा सामना उत्तराखंड विरुद्ध होईल. तर १३ मेला महाराष्ट्राचा सामना सिक्कीमविरुद्ध होईल. एकूण ८ गट पाडलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल. १५ - २० मेदरम्यान खेळविण्यात येणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीनंतर २२ मेला उपांत्य फेरी आणि २४ मेला अंतिम सामना होईल. (क्रीडा प्रतिनिधी)