सांगली : २००९ मध्ये तिहेरी महाराष्ट्र केसरी होताना पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्यावर अन्याय झाला. कुस्तीगीर संघाचे तत्कालीन उपाध्यक्ष काकासाहेब पवार यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात तशी कबुली दिली आहे. त्यामुळे ठरवून मला तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ दिले नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यावेळीच्या पंच कमिटीने ते मान्य व कबूल करावे. अन्यथा दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा मी कुस्तीगीर परिषदेला परत करणार आहे, असा इशारा दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिला आहे.अहिल्यानगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ‘शिवराज राक्षे याने पंचाला लाथ घातली ही चूक झाली. जो सामन्यात पंच होता, असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत,’ असे वादग्रस्त विधान चंद्रहार पाटील यांनी सोमवारी केले होते. त्यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष काकासाहेब पवार व आताचे संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनीही चंद्रहार पाटील यांच्यावर त्यावेळी अन्याय झाल्याचे कबूल केले.
शिवराज राक्षेवर अन्यायाची वेळ माझ्याप्रमाणे अशीच अन्यायाची वेळ आज शिवराज राक्षेवर आली आहे. पाच सेकंदाच्या पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे, त्या एका माकडामुळे शिवराज राक्षे यांचे पूर्ण आयुष्य बरबाद झाले आहे. त्यातून आता मलाही बाहेर पडायचे आहे. त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायाची दोन दिवसांत त्यावेळीच्या सर्व पंचांनी कबुली द्यावी. अन्यथा दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा मी परत पाठविणार आहे. मला त्याची गरज नाही. मी आयुष्यभर जिवंत असेपर्यंत कुस्ती क्षेत्रासाठी व लाल मातीसाठी काम करीत राहीन.
आता सर्वच पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय झाल्याचे कबूल करावे. त्यामुळे माझे समाधान होईल. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्यावर त्यावेळी जो आघात व घात झाला, त्यामुळे मी आत्महत्या करायला चाललो होतो. परंतु, माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी त्यातून बाहेर आलो. तेव्हापासून मी महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीकडे फिरकतही नाही. - चंद्रहार पाटील, पैलवान