जिंकूनही महाराष्ट्र स्पर्धेबाहेर!

By admin | Published: March 22, 2017 12:06 AM2017-03-22T00:06:53+5:302017-03-22T00:06:53+5:30

गेल्या वर्षी उपविजेता राहिलेल्या महाराष्ट्र संघाला यंदाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मात्र, मिझोरामने रेल्वेचा ५-१ धुव्वा उडवल्याने

Maharashtra out of winning! | जिंकूनही महाराष्ट्र स्पर्धेबाहेर!

जिंकूनही महाराष्ट्र स्पर्धेबाहेर!

Next

पणजी/वास्को : गेल्या वर्षी उपविजेता राहिलेल्या महाराष्ट्र संघाला यंदाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मात्र, मिझोरामने रेल्वेचा ५-१ धुव्वा उडवल्याने त्याचा परिणाम गुणतालिकेवर झाला. गुणफरकाच्या सरासरीमुळे महाराष्ट्र संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली. महाराष्ट्राला ‘ब’ गटातून तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी बलाढ्य केरळचा २-० ने पराभव केला.
वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने केरळवर वर्चस्व राखले होते. ३४ व्या मिनिटाला वैभव शिरळे आणि ५९ व्या मिनिटाला श्रीकांत वीरामल्लू याने शानदार गोल नोंदवले. या विजयानंतर महाराष्ट्र संघाचे एकूण सहा गुण झाले. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्र संघाला केवळ एका विजयाची आवश्यकता होती. मात्र, दुसरीकडे, मिझोराम आणि रेल्वे यांच्यातील सामना अनिर्णित राहणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. दुसऱ्या सामन्यात मिझोरामने मात्र रेल्वेचा ५-१ ने धुव्वा उडवला. या निकालाचा फटका महाराष्ट्र संघाला बसला.
मिझोराम आणि केरळ यांचे समान गुण होते. केरळ पराभूत झाल्याने मिझोराम दुसऱ्या स्थानावर पोहोचला. आता गुरुवारी (दि. २३) होणाऱ्या उपांत्य फेरीत मिझोरामचा सामना पश्चिम बंगालविरुद्ध तर गोव्याचा सामना केरळविरुद्ध होईल.
महाराष्ट्राने असे केले गोल...
केरळविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने ३४ व्या मिनिटाला आघाडीचा गोल नोंदवला. अ‍ॅरॉन डिकॉस्ताच्या क्रॉसिंगवर वैभव शिरळे याने चेंडूला जाळीची दिशा दाखविली. त्यानंतर ४० व्या मिनिटाला महाराष्ट्राला आणखी एक गोल करण्याची संधी होती़; परंतु, वैभवचा फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला.
मध्यंतरापर्यंत १-० आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने या सत्रातही जोरकस खेळ केला. ५९ व्या मिनिटाला अ‍ॅरोन डिकॉस्ताच्या क्रॉसवर श्रीकांत वीरमल्लूने केरळचा गोलरक्षक मेलर्बन दास याला चकवीत शानदार गोल नोंदवला. केरळने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, महाराष्ट्राचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Maharashtra out of winning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.