महाराष्ट्राचा पुरुष संघ बाद फेरीत

By Admin | Updated: November 26, 2015 02:26 IST2015-11-26T02:26:40+5:302015-11-26T02:26:40+5:30

यजमान महाराष्ट्राने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ४९व्या राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष गटात बाद फेरी गाठली आहे

Maharashtra men's team in the next round | महाराष्ट्राचा पुरुष संघ बाद फेरीत

महाराष्ट्राचा पुरुष संघ बाद फेरीत

मुंबई : यजमान महाराष्ट्राने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ४९व्या राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष गटात बाद फेरी गाठली आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या महिला संघानेदेखील विजय मिळवताना स्पर्धेच्या बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली आहे.
सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना आणि सोलापूर हौशी खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या स्पर्धेत बलाढ्य भारतीय रेल्वे आणि कर्नाटकच्याही दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली असल्याने स्पर्धेतील चुरस वाढली आहे. महाराष्ट्राने पुरुष गटामध्ये दिल्ली संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळवताना त्यांचा एक डाव व ७ गुणांनी १५-८ असा धुव्वा उडवला. सुरुवातीपासूनच एकतर्फी झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या आक्रमक धडाक्यापुढे दिल्लीकरांचा निभाव लागला नाही. कर्णधार युवराज जाधवने जबरदस्त अष्टपैलू खेळ करताना ३.२० मिनिटांचे दमदार संरक्षण आणि ३ बळी घेतले. प्रतीक वाईकर यानेही शानदार अष्टपैलू खेळ करताना ३ मिनिटांचे संरक्षण आणि २ बळी घेत दिल्लीच्या आक्रमणातली हवा काढली. तसेच मिलिंद चावरेकरने आक्रमणात ५ गडी मारताना दिल्लीच्या पराभवावर शिक्का मारला.
दुसऱ्या बाजूला बलाढ्य गतविजेत्या रेल्वेने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ओडिसा संघाचा २२-६ असा फडशा पाडला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात रेल्वेने ओडिसाला जणू खो-खोचे धडेच दिले. पी आनंदकुमार व रंजन शेट्टी यांनी प्रत्येकी ६ बळी घेताना ओडिसावर जबरदस्त दबाव टाकले. तर मनोज पवार आणि अमित पाटील यांनी शानदार अष्टपैलू खेळ करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
महिला गटात महाराष्ट्रासह मध्य भारत, विदर्भ, तामिळनाडू, कर्नाटक, कोल्हापूर, आंध्र प्रदेश, प. बंगाल, गुजरात आदी संघांनीही कूच केली.

Web Title: Maharashtra men's team in the next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.