खो-खोेमध्ये चारही सुवर्णपदकांवर यजमान महाराष्ट्राचा कब्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:40 IST2019-01-18T06:39:21+5:302019-01-18T06:40:03+5:30
खेलो इंडिया यूथ गेम्स : कबड्डीमध्ये मात्र यजमान संघाला एकही सुवर्ण नाही

खो-खोेमध्ये चारही सुवर्णपदकांवर यजमान महाराष्ट्राचा कब्जा!
- अमोल मचाले
पुणे : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गुरुवारी यजमान महाराष्ट्राने खो-खोमध्ये अपेक्षित कामगिरी करताना चारही सुवर्णपदके जिंकली. त्याचवेळी कबड्डीत मात्र महाराष्ट्र एकही सुवर्णपदक जिंकू शकला नाही. कबड्डीच्या १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या तसेच २१ वर्षांखालील मुलांच्या गटात पदकाच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या महाराष्ट्राला २१ वर्षांखालील मुलींच्या संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, उपांत्य फेरीत हा संघ हिमाचल प्रदेशकडून पराभूत झाल्याने कबड्डीत यजमानांची सुवर्णपदकाची पाटी कोरीच राहिली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्सच्या खो-खो स्पर्धेमध्ये १७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात दिल्लीचा कडवा प्रतिकार वगळता महाराष्ट्रासमोर उर्वरित गटांच्या अंतिम फेरीत कोणताही संघ आव्हान उभे करू शकला नाही. १७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीवर १९-१७ अशी निसटत्या फरकाने सरशी साधून सुवर्ण जिंकले. पहिल्या डावात महाराष्ट्र ७-५ असा आघाडीवर होता. दुसऱ्या डावात दिल्लीने नियंत्रण मिळवून ७-५ अशी सरस कामगिरी केली. यामुळे त्यांनी १२-१२ अशी बरोबरीही साधली. अखेर अतिरिक्त डावात ७-५ अशी बाजी मारत महाराष्ट्राच्या मुलींनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
दीक्षा सोनसुरकर (१.१० मिनिटे, ५ गुण), किरण शिंदे (३.२० मिनिटे), अश्विनी मोरे (२ मिनिटे, २.५० मिनिटे, २ गुण), जान्हवी पेठे (१.४० मिनिटे, १.१० मिनिटे, नाबाद २ मिनिटे, १ गुण), श्रुती शिंदे (३.३० मिनिटे, १ गुण) व साक्षी करे (२.१० मिनिटे) महाराष्ट्राच्या विजेतेपदाच्या शिल्पकार ठरल्या. दिल्लीकडून शहनाझ (१.४०, १.४०, १.३० मिनिटे, २ गुण), ममता (१.३०, १.४०, १.४० मिनिटे), मनू (२ मिनिटे, १.५० मिनिटे), सौम्या (३ गुण) आणि दिव्या (३ गुण) यांची झुंज अपयशी ठरली.
त्याचवेळी मुलांच्या गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशला १९-८ असे ११ गुणांनी सहजपणे लोळवून सुवर्ण बाजी मारली. पहिल्या डावात ९-४ अशी आघाडी घेणाºया महाराष्ट्राने दुसºया डावातही १०-४ने सरशी साधत वर्चस्व गाजवले. महाराष्ट्राच्या रोहन कोरे (२.३० मिनिटे, २ गुण), कर्णधार चंदू चावरे (२.१० मिनिटे, ३ गुण), ऋषिकेश शिंदे (नाबाद २.४० मिनिटे, १.४० मिनिटे, ४ गुण), दिलीप खांडवी (१ मिनिट, ३.१० मिनिट, २ गुण), आदित्य गणपुले (३.१० मिनिटे, १ गुण) आणि सौरभ अहीर (३ गुण) यांनी चमकदार खेळ केला.
कबड्डीत निराशा, एकच कांस्य
च्यजमान महाराष्ट्राच्या पदरी कबड्डीमध्ये मात्र निराशा हाती आली. २१ वर्षांखालील मुलींच्या गटातील कांस्य हे एकमेव पदक महाराष्ट्राच्या हातात आले. या गटाच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या मुली हिमाचल प्रदेशकडून १९-२२ अशा निसटत्या फरकाने पराभूत झाल्या.
च्योग्य नियोजनाचा अभाव, स्टार खेळाडू आणि कर्णधार सोनाली हेळवी हिला लाभलेले मर्यादित यश तसेच ताकदवान रेडर आफरीन शेख हिला प्रारंभापासून बाहेर बसवून अखेरच्या काही मिनिटांसाठी मैदानात उतरवणे याचा मोठा फटका यजमानांना बसला.
च्मध्यंतरालाहिमाचल संघ १२-१० असा २ गुणांनी आघाडीवर होता. महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही आघाडी घेण्याचे जोरदार प्रयत्न केले. मात्र, आधीच २ गुणांनी आघाडीवर असलेल्या हिमाचल संघाने फारसा धोका न पत्करता आपल्या बचावावर अधिक भर दिला.
हिमाचलचा सांघिक खेळ
हिमाचलच्या खेळाडूंनी सांघिक खेळावर भर देत महाराष्ट्राच्या चढाईपटूंना गुण घेण्यापासून रोखले. विशेषत: सोनालीच्या बालस्थानांचा अभ्यास त्यांनी केला होता. त्यानुसार सोनाली चढाईला आली की कव्हर्स अधिक मोकळे करून तिची अनेक आक्रमणे हिमाचल संघाने निष्प्रभ ठरवली. या लढतीत सोनालीला केवळ ५ गुण मिळवता आले. तिच्यासह आसावरी खोचरे (३ गुण), मानसी रोडे (३ गुण) आणि साक्षी रहाटे (३ पकडी) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली.
२१ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राने केरळचा ७-६ असा १ गुण आणि एका डावाने पराभव करीत सुवर्ण पटकावले. प्रियांका भोपी (नाबाद ४.४० मिनिटे, ३ मिनिटे), अपेक्षा सुतार (२.२०, १.२० मिनिटे, १ गुण), नितिका पवार (२ मिनिटे, १.५० मिनिटे), प्रणाली बेनके (१.५० मिनिटे, १ गुण), काजल भोर (नाबाद १ मिनिट, ३ गुण) आणि कविता घाणेकर (२ गुण) यांचा खेळ महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरला. पहिल्या डावात ७-२ अशी भक्कम आघाडी घेत महाराष्ट्राने निकाल निश्चित केला होता.
दुसरीकडे, केरळ संघावर ३.५० मिनिटे आणि १५-१३ अशी २ गुणांच्या फरकाने मात करीत २१ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राने सुवर्णपदकाला गवसणी घातली. पहिल्या डावात विजेत्या संघाने घेतलेली १०-६ अशी ४ गुणांची आघाडी निर्णायक ठरली. अवधूत पाटील (२.१०, १.५० मिनिटे, २ गुण), संकेत कदम (२.१० मिनिटे, १ गुण), ऋषिकेश मुरचावडे (१.५० मिनिटे, १ गुण) आणि अरुण गुणके (२ मिनिटे, ३ गुण) यांनी महाराष्ट्राच्या विजेतेपदात मोलाचे योगदान दिले. उपविजेत्या केरळकडून विझाग (१ मिनिट, ४ गुण), सॅमजित (१.३०, १.५० मिनिटे), अजित मोहन (१.३० मिनिट, २ गुण) यांनी चांगला खेळ केला.