महाराष्ट्राला ४ विजेतेपदांची संधी
By Admin | Updated: April 26, 2015 01:30 IST2015-04-26T01:30:23+5:302015-04-26T01:30:23+5:30
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने सांगली येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने जबरदस्त दबदबा राखला आहे.

महाराष्ट्राला ४ विजेतेपदांची संधी
मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने सांगली येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने जबरदस्त दबदबा राखला आहे. सब-ज्युनियर गट पाठोपाठ वरिष्ठ गट फेडरेशन चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील महाराष्ट्राने धडक मारल्याने महाराष्ट्राला स्पर्धेत तब्बल चार विजेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे.
खो-खो फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने सुरु असलेल्या या स्पर्धेत सब-ज्युनियर गटात महाराष्ट्राच्या किशोर संघाने बलाढ्य कोल्हापूरला धक्का देताना २१-११ असा विजय मिळवला. मध्यंतराला महाराष्ट्राने नाममात्र आघाडी घेताना ९-८ असे वर्चस्व मिळवले. यानंतर मात्र महाराष्ट्राने आपला जलवा दाखवत १२-३ अशी झेप घेत सामना जिंकला. कर्णधार काशिलिंग हिरेकुर्ब, वृषभ वाघ यांनी जबरदस्त आक्रमण व संरक्षण करताना संघाला अंतिम फेरी गाठून दिली. किशोरी गटात महाराष्ट्राने दणदणीत विजय मिळवताना पश्चिम बंगालचा १२-९ असा १ डाव व ३ गुणांनी फडशा पाडला. साक्षी वाघ, मयुरी मुत्याल, प्राजक्ता पवार आणि ज्ञानेश्वरी गाढे यांनी निर्णायक खेळ करताना महाराष्ट्राला विजयी केले.
वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने पुरुष गटात अपेक्षित कामगिरी करताना आंध्र प्रदेशचा १७-४ असा १ डाव व १३ गुणांनी सफाया केला. विशेष म्हणजे पहिल्याच डावात महाराष्ट्राने एकतर्फी आघाडी घेतल्यानंतर आंध्र प्रदेशने सामन्यातून माघार घेतली. यावरुनच महाराष्ट्राचा धडाका लक्षात येतो. महिला गटात देखील महाराष्ट्राने धमाकेदार विजय मिळवताना पश्चिम बंगालाचा २२-१० असा एक डाव व १२ गुणांनी चुराडा केला. मध्यंतराला ८-४ अशी आघाडी घेतल्यानंतर महाराष्ट्राने आक्रमक खेळ करताना बंगालला डोके वर काढण्याची एकही संधी न देता सहज बाजी मारली. सुप्रिया गाढवे, श्वेता गवळी आणि शितल भोर यांनी शानदार अष्टपैलू खेळ करताना महाराष्ट्राला अंतिम फेरी गाठून दिली.