Maharashtra boxer Ananta Chopde won Gold in 23rd President Cup Champion | मेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण
मेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण

मुंबई : इंडोनेशियातील लाबुऑनबाजो येथे झालेल्या अध्यक्षीय चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाने सात सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं पटकावली. सहा विश्व अजिंक्यपद नावावर असलेल्या दिग्गज बॉक्सर मेरी कोमचे सुवर्ण या स्पर्धेतील चर्चेचा विषय ठरले. बऱ्याच दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या अपेक्षित कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले. तिच्यासह सिमरनजित कौर, जमुना बोरो,  मोनिका, अंकुश दाहिया, नीरज स्वामी, अंनता चोपडे यांनीही भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. भारतीय संघाने या स्पर्धेत सर्वोत्तम संघाचा मानही मिळवला.


बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावना गावच्या अनंताचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक आहे. महाराष्ट्राच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू व सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक गिरीश पवार याचे मार्गदर्शन लाभले. मागील वर्षी पुणे येथे आर्मी स्पोर्ट इंस्टिट्यूट येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अनंताने महाराष्ट्रासाठी रौप्यपदक जिंकले होते. रेल्वेत नोकरी करत असलेल्या अध्यक्षीय बॉक्सिंग स्पर्धेत 52 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानच्या रहमानी आर. चा 5-0 असा सहज पराभव केला. 

अकोला जिल्ह्यातील राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीत सतीशचंद्र भट यांच्या देखरेखीखाली अनंतानं बॉक्सिंगचे धडे गिरवले. 2009 पासून त्यानं बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत आपला दबदबा दाखवून दिला. लोकमतशी बोलताना तो म्हणाला,'' मोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याचे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले. हे पदक आत्मविश्वास वाढवणारे आहे. आता खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगचा प्रवास सुरू झाला आहे.''  अनंताचे वडील शेतकरी आहेत, तर मोठा भाऊ रिक्षा चालवतो. 

21 वर्षीय अनंतानं 2010मध्ये कोलकाता येथे झालेल्या सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत ( 2010) सुवर्णपदकाची कमाई केली.  पुढच्याच वर्षी त्याला कांस्यपदक समाधान मानावे लागले. 2016मध्ये युवा स्पर्धेतील कांस्यपदक त्याच्या नावावर आहे.  याच वर्षी त्यानं वरिष्ठ गटात पदार्पण केले. गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्यानं कांस्यपदक जिंकले. 2018मध्ये त्याने पुण्यात झालेल्या स्पर्धेत कांस्यचे रौप्यपदकात रुपांतर केले.
  


Web Title: Maharashtra boxer Ananta Chopde won Gold in 23rd President Cup Champion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.