बांगलादेश ठेवणार मदरसा बंद

By Admin | Updated: June 7, 2015 01:04 IST2015-06-07T01:04:45+5:302015-06-07T01:04:45+5:30

बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय संघाच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्टेडियमजवळ असलेला एक इस्लामी मदरसा बंद केला असून चिथावणी देणाऱ्या बॅनरवर बंदी घातली आहे.

Madarsa shutdown to keep Bangladesh | बांगलादेश ठेवणार मदरसा बंद

बांगलादेश ठेवणार मदरसा बंद

ढाका : बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय संघाच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्टेडियमजवळ असलेला एक इस्लामी मदरसा बंद केला असून चिथावणी देणाऱ्या बॅनरवर बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.
रौजातुन सलहीन अलीम मदरसाचे प्रमुख मौलाना अब्दुस शकूर म्हणाले की, ‘आम्हाला अधिकाऱ्यांकडून एक पत्र मिळाले. त्यात पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान १० ते १४ जून या कालावधीत मदरसा बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.’ मौलाना शकूर पुढे म्हणाले, ‘प्रशासनातर्फे मदरसा बंद ठेवण्यास प्रथमच सांगण्यात आले आहे.’ फतुल्लाह स्टेडियममध्ये नऊ वर्षांनंतर प्रथमच कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. यापूर्वी आॅस्ट्रेलियाविरुद्ध या स्टेडियममध्ये २००६ मध्ये कसोटी सामना खेळला गेला होता. आजतागायत या स्टेडियममध्ये १० वन-डे सामने खेळल्या गेले आहेत. त्यात आशिया कप २०१४ च्या स्पर्धेदरम्यान खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांचा समावेश आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे सुरक्षा प्रमुख हुसेन इमाम म्हणाले की, भारतीय क्रिकेटपटूंना चोख सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी मदरसा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय संघ एक कसोटी व तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सोमवारी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे.
मौलान शकूर प्रशासनाच्या निर्णयामुळे स्तंभित झाले. कारण गेल्या वर्षी आशिया कप स्पर्धेदरम्यानही मदरसा बंद करण्यात आलेला नव्हता व नियमित शाखांचे संचलन झालेले होते.
शकूर म्हणाले,‘यावेळी आम्हाला पाच दिवसांची सुटी जाहीर करण्याची सूचना मिळाली आहे. आम्हाला मानवतेच्या आधारावर केवळ २५ अनाथ बालकांना आमच्या वसतिगृहात ठेवण्याची तोंडी परवानगी मिळाली आहे.’ बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एका ब्लॉगरच्या हत्या प्रकरणात मदरसामधील दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्यानंतर बांगलादेशमधील मदरसे चर्चेत आहेत.
क्रिकेट बोर्डाचा अधिकारी म्हणाला, यंदा विश्वकप स्पर्धेदरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. विश्वकप क्रिकेट स्पर्धेदरम्यान पंचांचे काही निर्णय बांगलादेश संघाच्या विरोधात गेल्यामुळे येथील क्रिकेट चाहते संतापले होते. भाराताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे बांगलादेश संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या. बांगलादेश मूळचे आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी त्यावेळी भारत बलाढ्य असल्यामुळे पंचांनी त्यांच्या बाजूने निर्णय दिले, असे वक्तव्य केल्यामुळे वाद आणखी चिघळला होता. इमाम म्हणाले की, अधिकाऱ्यांनी सामन्यादरम्यान स्टँडमध्ये भारतविरोधी बॅनरवर बंदी घातली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Madarsa shutdown to keep Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.