नवी दिल्ली : राजधानीच्या उत्तरेकडील छत्रसाल स्टेडियमबाहेर झालेल्या मारहाण आणि हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिकची दोन पदके जिंकणारा मल्ल सुशील कुमार याच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे.५ मे रोजी २३ वर्षांचा युवा मल्ल सागर राणा याने जबर मारहाणीनंतर इस्पितळात प्राण गमावले होते. याशिवाय सागरचे चार मित्र गंभीर जखमी झाले. यात सुशीलसह अनेक जण आरोपी आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीदेखील केली होती. सुशील सतत आपले स्थान बदलत असून, हत्येनंतर तो हरिद्वार आणि ऋषीकेशला गेल्याची माहिती आहे. तो एका आश्रमात थांबल्याची माहिती मिळताच तेथील पोलिसांनीदेखील छापा घातला होता. मात्र, तो अद्याप पोलिसांपासून दूर आहे.स्टेडियमशेजारच्या माॅडर्न कॉलनीत स्वत:चा फ्लॅट सुशीलने सागरला भाड्याने दिला होता. फ्लॅट रिकामा करण्यावरून वाद विकोपाला गेल्यामुळे सुशीलने काही जणांना हाताशी धरुन सागरचा काटा काढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.यासंदर्भात सुशीलचे सासरे महाबली सतपाल यांच्यासह अनेकांकडे विचारपूस करण्यात आली आहे. हत्याकांडात सुशीलचा हात असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असून, आरोपपत्रात त्याचे नाव आहे. तो सतत गुंगारा देत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. सुशीलने २००८ च्या बीजिंग आणि २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदके जिंकली होती. त्याला ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
सुशील कुमारविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:11 IST