Lionel Messi Argentina's Football Team To Play Friendly Match In Kerala : छ फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये अर्जेंटिना संघाला वर्ल्ड चॅम्पियन करणारा कर्णधार आणि फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार असल्याची गोष्ट चांगलीच चर्चेत आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या त्याच्या भारत दौऱ्याची चर्चा संपते ना संपते तोवर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिना संघ भारतात एक मैत्रीपूर्ण सामना खेळणार असल्याचे पक्के झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् कुठं रंगणार हा सामना?
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ २०२५ च्या उर्वरित कालावधीत दोन मैत्रीपूर्ण लढती खेळणार आहे. यातील पहिला सामना ६ ते १४ ऑक्टोबर या दरम्यान अमेरिकेत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर १० ते १८ दरम्यान अर्जेंटिनाचा संघ भारतातील केरळच्या मैदानात सामना खेळणार आहे. या दोन्ही सामन्यात अर्जेंटिना संघाचे नेतृत्व मेस्सी करेल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना भारतीय मैदानात उतरणार, पण...
स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ भारतीय मैदानात एक सामना खेळणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली असली तरी ही लढत कोणत्या संघासोबत होणार? अन् नेमकी तारख काय? ही गोष्ट मात्र गुलदस्त्यातच आहे. लवकरच याचीही घोषणा करण्यात येईल. भारतात मेस्सीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याला मैदानात खेळताना पाहण्याची ही भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरेल.
या मैदानात खेळवला जाऊ शकतो सामना
लियोनल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाने २०२२ मध्ये फिफा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. जेतेपदानंतर अर्जेंटिनाच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान समर्थन देणाऱ्या केरळ राज्यातील चाहत्यांचे विशेष आभार मानले होते. मागील वर्षीच नोव्हेंबरमध्ये केरळचे क्रीडा मंत्री वी.वी. अब्दुरहीमान यांनी अर्जेंटिनाच्या केरळ दौऱ्यासंदर्भात माहिती दिली होती. या दौऱ्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते सातत्याने अर्जेंटिना असोसिएशनचे मुख्य कर्मशियल आणि मार्केटिंग अधिकारी लिएंड्रो पीटरसन यांच्या संपर्कात होते. त्यामुळेच अर्जेंटिनाचा संघ केरळमधील तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियम सामना खेळेल, असा बांधला जात आहे.