जीवन अखेर विम्बल्डन खेळणार

By Admin | Updated: June 27, 2017 00:47 IST2017-06-27T00:47:11+5:302017-06-27T00:47:11+5:30

विम्बल्डन खेळण्यासाठी भारताचा खेळाडू जीवन नेंदुचेझियन याला दुहेरीचा जोडीदार मिळणे कठीण झाले होते. गेल्या २४ तासांत

Life will finally play Wimbledon | जीवन अखेर विम्बल्डन खेळणार

जीवन अखेर विम्बल्डन खेळणार

नवी दिल्ली : विम्बल्डन खेळण्यासाठी भारताचा खेळाडू जीवन नेंदुचेझियन याला दुहेरीचा जोडीदार मिळणे कठीण झाले होते. गेल्या २४ तासांत त्याला अनेकदा ‘होकार’ आणि ‘नकारां’चा सामना करावा लागला; पण जीवनने सकारात्मक लढाई जिंकलीच. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्यासाठी त्याला अमेरिकेचा खेळाडू जेयर्ड डोनाल्डसन याची साथ मिळाली आहे.
करिअरमध्ये प्रथमच जीवनला ग्रॅण्डस्लॅम पदार्पणाची संधी आली. तथापि, त्याचा जोडीदार हियोन चुंग याच्या ढोपराला दुखापत होताच जीवनचे स्वप्न धुळीस मिळणार की काय अशी स्थिती उद्भवली होती. त्याचवेळी अमेरिकेचा डोनाल्डसन हा परमेश्वराच्या दूताप्रमाणे अवतरला. जीवनसोबत खेळण्यास त्याने हसत-हसत होकार दिला आहे.
आॅस्ट्रेलियाचा मॅट रीड याच्यासोबत अ‍ॅगोन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत सहभागी झालेला जीवन ईस्टबर्न येथून बोलताना म्हणाला, ‘१६० रँकिंगवर दुसऱ्यांदा जोडी बनविणे शानदार ठरले.’ चेन्नईच्या या खेळाडूचे ग्रॅण्डस्लॅममध्ये सहभागी होण्याचे स्वप्न होते. मात्र, चुंगने खेळण्यास नकार देताच आशेवर पाणी फेरले गेले. अवघ्या २४ तासांत नवा जोडीदार शोधण्याचे जीवनपुढे आव्हान होते. यावर जीवन म्हणाला, ‘चुंगचा नकार ऐकताच माझी मानसिक स्थिती खराब झाली, पण त्याने प्रवेशाच्या अंतिम वेळेपूर्वी कळविल्याचेही समाधान होते. मी सकारात्मकपणे विचार केला आणि नव्या जोडीदाराचा शोध घेतला. त्यात यश आल्याचा आनंद आहे. ६५ जणांत समावेश असलेल्या दुहेरीचा जोडीदार शोधण्याचे आव्हान होते, पण त्यात यश आले.’ (वृत्तसंस्था)
डावखुरा खेळाडू असलेला जीवन पुढे म्हणाला, ‘सायंकाळी ५ वाजता जेयर्डचा होकार मिळाला. तो शानदार खेळाडू आहे. एकेरीचा सामना खेळण्यासाठी तो ईस्टबर्नला आला आहे. मी त्याच्याशी चर्चा केली. त्याने आपल्या कोचसोबत चर्चेसाठी मला वेळ मागितला. नंतर त्याचा होकार आला की चला सोबत खेळुया! हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.’ (वृत्तसंस्था)
असाही योगायोग....
या दोघांचे भाग्य बघा. दोघांचेही संयुक्त रँकिंग १६० आहे. जीवन ९५ व्या, तर जेयर्ड ६५ व्या स्थानावर आहे. पुरुष दुहेरीच्या ड्रॉमध्ये थेट स्थान पटकाविण्यासाठी १६० हीच ‘कट आॅफ रँकिंग’ ठेवण्यात आली होती.

Web Title: Life will finally play Wimbledon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.