लिट्टन व मुस्तफिजूरला अंतिम संघात स्थान मिळण्याची आशा
By Admin | Updated: June 17, 2015 02:02 IST2015-06-17T02:02:20+5:302015-06-17T02:02:20+5:30
भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आल्यामुळे यमजान बांगलादेश संघाने समाधान व्यक्त केले आहे.

लिट्टन व मुस्तफिजूरला अंतिम संघात स्थान मिळण्याची आशा
मिरपूर : भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आल्यामुळे यमजान बांगलादेश संघाने समाधान व्यक्त केले आहे. बांगलादेश संघ तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक असून, त्यासाठी अनुभवी खेळाडूंना संंधी देण्यास प्रयत्नशील आहे. त्यामुळे मुस्तफिजूर रहमान व लिट्टन दास या युवा खेळाडूंसाठी गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत अंतिम संघात स्थान मिळविणे आव्हान ठरणार आहे.
बांगलादेश वन-डे सामन्यांच्या मालिकेतील कामगिरीच्या आधारावर आयसीसी क्रमवारीत अंतिम आठमध्ये स्थान कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. त्यात यशस्वी ठरल्यास त्यांचा २०१७मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जगातील अव्वल ७ संघ व यजमान इंग्लंड या संघांचा समावेश राहणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर आहे.
भारताविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत गुरुवारी होणार आहे. भारताविरुद्ध कसोटी सामन्यात संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या मुशफिकर रहीमने स्पष्ट केले, की बोटाच्या दुखापतीतून सावरलो असून वन-डे मालिकेत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळण्यास सज्ज आहे.
मुशफिकरच्या निर्णयानंतर यष्टिरक्षणाची जबाबदारी तोच सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवान गोलंदाजीसाठी तस्कीन अहमद व रुबेल हुसेन पहिली पसंती असतील. वन-डे संघाचा कर्णधार मशरफी मुर्तजा शानदार गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १५१ सामन्यांत १९३ बळी घेतले आहेत. त्यामुळे मुस्तफिजूरसाठी ही मालिका अनुभव घेण्याची संधी असल्याचे निश्चित आहे. लिट्टनला अंतिम संघात स्थान मिळाले, तर तो तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येईल. रोनी तालुकदार व तमीम इक्बाल डावाची सुरुवात करणार असतील, तर सौम्य सरकारला वन-डाऊन फलंदाजीची संधी मिळू शकते. लिट्टनला संधी मिळाली, तर तो स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असेल. लिट्टनने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात यष्टिरक्षणाव्यतिरिक्त ४४ धावांची शानदार खेळी केली होती. गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळेल किंवा नाही, याची लिट्टनला कल्पना नाही; पण फातुल्लामध्ये मोठी खेळी करता न आल्यामुळे मात्र तो निराश झाला आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामन्यात मोहंमद हफीज व शाहीद आफ्रिदी यांना बाद करून मुस्तफिजूरने पदार्पणाच्या लढतीत प्रसिद्धी मिळवली.