अखेरचे दोन बळी जॉन्सनच्या नावे
By Admin | Updated: November 18, 2015 03:59 IST2015-11-18T03:59:38+5:302015-11-18T03:59:38+5:30
आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने न्यूझीलंडविरुद्ध मंगळवारी वाका मैदानावर अनिर्णीत संपलेल्या दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरचे दोन बळी घेत आंतरराष्ट्रीय

अखेरचे दोन बळी जॉन्सनच्या नावे
पर्थ : आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने न्यूझीलंडविरुद्ध मंगळवारी वाका मैदानावर अनिर्णीत संपलेल्या दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरचे दोन बळी घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
यजमान संघाने उपाहारानंतर ७ बाद ३८५ धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. न्यूझीलंडपुढे मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी ४८ षटकांत ३२१ धावा फटकावण्याचे लक्ष्य होते. दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे जवळजवळ तासाभराचा खेळ वाया गेला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेले न्यूझीलंडचे फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले नाही. न्यूझीलंडने २ बाद १०४ धावांची मजल मारली असता सामना अनिर्णीत संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्या वेळी रॉस टेलर (३६) आणि केन विल्यम्सन (३२) खेळपट्टीवर होते. आॅस्ट्रेलियाने गॅबा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २०८ धावांनी विजय मिळविला होता. या विजयाच्या जोरावर आॅस्ट्रेलिया संघ चॅपेल-हॅडली चषक आपल्याकडे कायम राखणार असल्याचे निश्चित झाले होते.
दिवसाच्या सुरुवातीलाच आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या जॉन्सनने दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत परतवत स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. जॉन्सनने टॉम लॅथमला (१५) हेजलवूडकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मार्टिन गुप्टील (१७) याला माघारी परतवले.
त्याआधी, जॉन्सन ज्या वेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्या वेळी न्यूझीलंडच्या संघाने गार्ड आॅफ आॅनर दिला. पहिल्या डावात १५७ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेणाऱ्या जॉन्सनने त्या तुलनेत दुसऱ्या डावात चांगला मारा केला. त्याने ६ षटकांत २० धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्याआधी, सकाळच्या सत्रात आॅस्ट्रेलियाची सुरुवात विशेष चांगली झाली नाही. त्यांचे दोन्ही शतकवीर फलंदाज कर्णधार स्टिव्हन स्मिथ आणि अॅडम व्होग्स झटपट माघारी परतले. स्थिमने १३८ धावा केल्या. त्याला ट्रेन्ट बोल्टने (२-७७) माघारी परतवले. डग ब्रेसवेलने त्यानंतर मिशेल मार्शला (०१) पायचित केले. व्होग्स (११९) टीम साऊदीचे (४-९७) लक्ष्य ठरला. आॅस्ट्रेलियाने सकाळच्या सत्रात २४ धावांत ३ फलंदाजांना गमावले. पीटर नेव्हील (३५) आणि जॉन्सन (२९) यांनी आक्रमक ६१ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाला डाव घोषित करण्याची संधी प्रदान केली.
जॉन्सन फलंदाजीसाठी आला त्या वेळी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्याला गार्ड आॅफ आॅनर दिला. तो खेळपट्टीवर आल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमने त्याच्यासोबत हस्तांदोलन केले. जॉन्सनला साऊदीने माघारी परतवले. (वृत्तसंस्था)