लंका दोनशे धावांत गारद
By Admin | Updated: October 23, 2015 01:36 IST2015-10-23T01:36:14+5:302015-10-23T01:36:14+5:30
सोबर्स-टिसेरा चषक कसोटी सामन्यांत पहिल्या दिवशी वेस्टइंडिजने श्रीलंकेला अवघ्या दोनशे धावांत गुंडाळले. जोमेल वारिकन याने ४ गडी तंबूत धाडत लंकेच्या फलंदाजीचे

लंका दोनशे धावांत गारद
कोलंबो : सोबर्स-टिसेरा चषक कसोटी सामन्यांत पहिल्या दिवशी वेस्टइंडिजने श्रीलंकेला अवघ्या दोनशे धावांत गुंडाळले. जोमेल वारिकन याने ४ गडी तंबूत धाडत लंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. जॅसन होल्डर व जेरॉम टेलर यांनी प्रत्येकी २ बळी घेत जोमेलला चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा वेस्टइंडिजने १ गडी गमावून १७ धावा केल्या होत्या.
कोलंबो येथील पी. सारा ओव्हल मैदानावर गुरूवारपासून दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव ६६ षटकांत २०० धावांत संपुष्टात आला. जेरॉम टेलरच्या पहिल्याच षटकांत सलामीवर कौशल सिल्वा (०) रामदिनकडे झेल देऊन तंबूत परतला. पाठोपाठ दिमुथ करुणारत्ने (१३), कुशल मेंडिस (१३) दोन चेंडूंच्या अंतराने बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली.
त्यानंतर आलेले दिनेश चंदीमल (२५), अँजेलो मॅथ्यूज (१४) ठरावीक अंतराने बाद झाल्याने नव्वदीतच निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मिलिंदा श्रीवर्धनाने (६८) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत गेले. रंगना हेराथ याने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद २६ धावांची खेळी करीत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. पहिल्या दिवसअखेर वेस्टइंडिजने ५.२ षटकांत १ बाद १७ धावा केल्या होत्या. शाई होप (४) याला प्रसादने पायचीत करीत तंबूत धाडले. क्रेग ब्राथवेट (४), देवेंद्र बिशू (५) धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव : ६६ षटकांत सर्वबाद २००, दिमुथ करूणारत्ने पायचीत गो. होल्डर १३, कौशल सिल्वा झे. रामदिन गो. टेलर ०, दिनेश चंदीमल त्रि.गो. टेलर २५, मिलिंदा श्रीवर्र्धना झे. टेलर गो. वारिकन ६८, रंगना हेराथ नाबाद २६, जेरॉम टेलर २/५०, केमार रोश १/३०, जॅसन होल्डर २/२२, जोमेल वारिकन ४/६७, देवेंद्र बिशू १/१८, वेस्ट इंडिज : ५.२ षटकांत १ बाद १७, क्रेग ब्राथवेट नाबाद ४, शाई होप पायचीत गो. प्रसाद ४, देवेंद्र बिशू नाबाद ५.