ललिता रिओसाठी स्वत:ला अजमावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 23:53 IST2015-09-15T23:53:39+5:302015-09-15T23:53:44+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली महाराष्ट्र कन्या ललिता बाबर आजपासून सुरु होणाऱ्या ५५व्या राष्ट्रीय ओपन अॅथलेटीक्समध्ये वर्चस्व गाजवण्यास सज्जा

ललिता रिओसाठी स्वत:ला अजमावणार
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली महाराष्ट्र कन्या ललिता बाबर आजपासून सुरु होणाऱ्या ५५व्या राष्ट्रीय ओपन अॅथलेटीक्समध्ये वर्चस्व गाजवण्यास सज्जा झाली आहे. यास्पर्धेकडे ती आॅलिम्पिकची पुर्वतयारी म्हणून पाहत असून विजेतेपद पटकावण्याचा तीचा सर्वतोपरी प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे यास्पर्धेत इंदरजीत सिंग आणि टिंटू लुका या ओलिम्पिक पात्र खेळाडूंसह इतर अव्वल राष्ट्रीय खेळाडूंच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल. विशेष म्हणजे इतर खेळाडूंच्या दृष्टीने आॅलिम्पिक प्रवेशासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असल्याने प्रत्येक खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करेल. शिवाय लैगिक वादानंतर पुनरागमन करणारी दुतीचंदवर विशेष लक्ष असेल.
कोलकाता येथे रंगणाऱ्या या स्पर्धेत रेल्वेचे ललिता आणि टिंटू यांना आपापल्या गटात संभाव्य विजेते मानले जात आहे. नुकताच झालेल्या जागतिक अॅथलेटीक्समध्ये ३००० स्टीपलचेसमध्ये आठवे स्थान मिळवलेल्या ललिताला आव्हान मिळण्याची शक्यता धूसरच आहे. जागतिक अॅथलेटीक्समध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवलेल्या ललिताची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. टिंटू ८०० मीटरमध्ये विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाते. तीने जागतिक अॅथलेटीक्समध्ये २:००:९५ सेकंदाच्या वेळेसह रिओचे तिकीट मिळवले होते. दुसऱ्या बाजूला लिंग वादामध्ये अडकल्यानंतर ओडीसाच्या दुतीचंदला स्पर्धांत खेळण्याची मुभा मिळाली.