ललिता बाबरला आॅलिम्पिकचे तिकीट
By Admin | Updated: June 7, 2015 00:57 IST2015-06-07T00:57:58+5:302015-06-07T00:57:58+5:30
२१ व्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ललिता बाबर हिने ३००० मीटर स्टेपलचेजमध्ये एकहाती वर्चस्व राखताना सुवर्णपदकाची

ललिता बाबरला आॅलिम्पिकचे तिकीट
वुहान : २१ व्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ललिता बाबर हिने ३००० मीटर स्टेपलचेजमध्ये एकहाती वर्चस्व राखताना सुवर्णपदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या कामगिरीसह तीने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठीदेखील पात्रता मिळवली आहे. त्याचवेळी थाळीफेकीमधील भारताचा हुकमी खेळाडू विकास गौडानेदेखील आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरले.
ललिताने सुवर्ण मिळवताना ९: ३३.१३ सेकंदांची जबरदस्त वेळ नोंदवताना सुवर्णपदाकासहितच नवा राष्ट्रीय विक्रमदेखील प्रस्थापित केला. दखल घेण्याची बाब म्हणजे बहारीनची अव्वल धावपटू रुथ चेबेटच्या माघारीनंतर ललिताला या स्पर्धेत संभाव्य विजेती मानले जात होते आणि ललिताने त्याच तोडीची कामगिरी केली. दरम्यान इंचिओन आशियाई स्पर्धेमध्ये ललिताला मागे टाकून रौप्य पटकावणाऱ्या चीनच्या ली झेनसूला ९ मिनिटे ४१.३६ सेंकद अशा कामगिरीसह द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे एकप्रकारे ललिताने यावेळी लीचा वचपादेखील काढला. तर, झांग शियान हिने ९ मिनिटे ४६.८२ सेकंदासोबत तिसरे स्थान पटकावले. याआधी ललिताचा विक्रम ९ मिनिटे ३५.३७ सेकंदांचा होता. हा विक्रम तीने ग्लास्गोत २०१४ मध्ये राष्ट्रकुल खेळादरम्यान केला होता.
दुसऱ्या बाजूला विकास गौडाने देखील आपली छाप पाडताना भारताला थाळीफेकमध्ये सुवर्ण मिळवून दिले. विशेष म्हणजे गतस्पर्धेतदेखील सुवर्ण पटकावलेल्या विकासने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखले. अजूनपर्यंत रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र न ठरलेल्या गौडाने ६२.०३ मीटर फेक करताना बाजी मारली. दखल घेण्याची बाब म्हणजे या वर्षी दोनवेळा विकासने ६५ मीटरहून अधिक अंतराची फेक केली असल्याने ही कामगिरी निश्चितच त्याच्या लौकिकास साजेशी नव्हती. मात्र तरीदेखील त्याने सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले. कुवेतच्या इशा जनकावी (६१.५७ मि) आणि इराणच्या महमूद समीमी (५९.७८ मिनिटे) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली. अन्य स्पर्धेत भारताच्या जी. लक्ष्मणने १० हजार मीटरमध्ये २० मिनिटे ४२.८१ सेकंदांच्या वेळेसह रौप्य पदक जिंकले. (वृत्तसंस्था)