राजस्थान क्रिकेट संघटनेतून ललित मोदींची उचलबांगडी
By Admin | Updated: October 12, 2014 02:27 IST2014-10-12T02:27:34+5:302014-10-12T02:27:34+5:30
आयपीएलचे वादग्रस्त माजी कमिशनर ललित मोदी यांची आज, शनिवारी राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

राजस्थान क्रिकेट संघटनेतून ललित मोदींची उचलबांगडी
>जयपूर : आयपीएलचे वादग्रस्त माजी कमिशनर ललित मोदी यांची आज, शनिवारी राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. स्थानिक भाजप नेते अमीन पठाण यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाने संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
दिवसभर चालेल्या घडामोडीमध्ये आमसभेच्या बैठकीत पठाण यांची बहुमताने कार्यवाहक अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यामुळे मोदी यांचा कार्यकाळ केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत नाटय़मय पद्धतीने संपुष्टात आला. ‘आरसीए’च्या 33पैकी 23 जिल्हा क्रिकेट संघटनेच्या प्रतिनिधींनी मोदी हटाव मोहिमेचे समर्थन केले. बीसीसीआयकडून आजीवन बंदीच्या कारवाईला सामोरे जात असलेल्या मोदी यांची यंदा मे महिन्यात आरसीएच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मोदी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बीसीसीआयने आरसीएवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे राज्यातील खेळाडूंना बोर्डाची मान्यता असलेल्या स्पर्धेत सहभागी होता येत नव्हते.
मोदी यांची उचलबांगडी करण्यात आल्यामुळे आरसीएचा बीसीसीआयमध्ये परतण्याचा मार्ग प्रशस्त झाला. त्यामुळे आरसीएला बोर्डातर्फे वार्षिक अनुदान मिळेल आणि सवाई मानसिंग स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याची संधी मिळेल.
बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केल्यामुळे आरसीएला कार्य करण्यास अडचण भासत होती. सदस्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे सदस्यांनी कोटाचे भाजप खासदार पठाण यांना पाठिंबा दिला. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण यांना वसुंधरा राजे सिंधिया यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा पाठिंबा आहे.
बैठकीनंतर पठाण म्हणाले, ‘आम्ही आज ललित मोदींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर केला. आरसीएला 33 पैकी 23 जिल्हा संघटनांचा पाठिंबा आहे. बैठकीमध्ये पवन गोयल (कोषाध्यक्ष) आणि महमुद अब्दी (उपाध्यक्ष) यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी बीसीसीआयच्या अधिका:यांची भेट घेणार असून पुढील कारवाईबाबत सल्ला घेणार आहोत.’ (वृत्तसंस्था)