ललित मोदी आरसीएत परतणार!
By Admin | Updated: December 17, 2015 01:24 IST2015-12-17T01:24:01+5:302015-12-17T01:24:01+5:30
आयपीएलचे वादग्रस्त माजी चेअरमन आणि भारतातून परागंदा झालेले ललित मोदी तसेच त्यांच्या गटाचे राजस्थान क्रिकेट संघटनेत पुनरागमन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ललित मोदी आरसीएत परतणार!
जयपूर : आयपीएलचे वादग्रस्त माजी चेअरमन आणि भारतातून परागंदा झालेले ललित मोदी तसेच त्यांच्या गटाचे राजस्थान क्रिकेट संघटनेत पुनरागमन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या अमीन पठाण गटाने मोदी यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध आणण्यात येणारा अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्याआधीच बुधवारी अधिकृतपणे मागे घेतला.
न्या. ज्ञानसुधा मिश्रा यांनी आज जिल्हा क्रिकेट संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘जे १५ जिल्हे मोदी आणि अन्य तीन पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास आणणार होते, त्यांनी खेळाच्या हिताकरिता प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही. ललित मोदी यांचा गट लोकशाही पद्धतीने निर्वाचित झाला आहे. अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्याने स्थिती ‘जैसे थे’ राहील.’’
बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींनी अमीन पठाण यांच्याद्वारे अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मिळालेल्या माहितीनुसार पठाण
गटाने आरसीएवर वर्चस्व मिळविण्यासाठी बळाचा कथितरीत्या वापर केला. ललित मोदी यांच्या समर्थकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दगडफेक केली. (वृत्तसंस्था)