ललितने एकाच षटकात मारले सहा षटकार
By Admin | Updated: July 7, 2016 20:35 IST2016-07-07T20:35:12+5:302016-07-07T20:35:12+5:30
एकाच षटकात सहा षटकार ठोकणे आता फारसे कठीण काम राहिले नाही. राजाधानीच्या क्रिकेटमध्ये गेल्या दीड महिन्यात अशी कामगिरी दोन फलंदाजांनी केली आहे.

ललितने एकाच षटकात मारले सहा षटकार
नवी दिल्ली : एकाच षटकात सहा षटकार ठोकणे आता फारसे कठीण काम राहिले नाही. राजाधानीच्या क्रिकेटमध्ये गेल्या दीड महिन्यात अशी कामगिरी दोन फलंदाजांनी केली आहे. आता त्यात भर पडली आहे युवा फलंदाज ललित यादव याची. ललित यादव याने डीडीसीए लीगच्या एकाच सामन्यात एकाच षटकात सहा षटकार ठोकले.
२८ मेमध्येदेखील रघुवीरसिंह हॉट वेदर क्रिकेट स्पर्धेत स्थानिक फलंदाज दीपक खत्री याने एकाच षटकात ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता आणि त्याने या सामन्यात २१४ धावाही ठोकल्या होत्या. त्यानंतर ललित यादव त्याच्या पराक्रमाने प्रकाशझोतात आला आहे. ललितने एकाच षटकात सहा षटकार ठोकले. तसेच १५ चौकार आणि १२ षटकारांसह १५0 धावांची नाबाद आकर्षक खेळी केली. ललितने त्याच्या १५0 धावांतील १३२ धावा फक्त चौकार आणि षटकाराने ठोकल्या.
ललितचे वादळी शतक आणि भारतीय अंडर १९ खेळाडू हिमांशू राणा (७६) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर स्पोर्टिंग क्लबने डीसीए टष्ट्वेंटी-२0 लीग स्पर्धेत मद्रास क्लबचा २३३ धावांनी पराभव करीत चार गुण मिळवले.
फिरोजशाह कोटलावर झालेल्या या लढतीत स्पोर्टिंग क्लबने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ४ बाद ३0५ अशी विशाल धावसंख्या रचली. त्यानंतर मद्रास क्लबचा संघ १८.२ षटकांत ७२ धावांत गारद झाला. विजन पांचाल व योगेश कुमार यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करीत मद्रासचा डाव गुंडाळण्यात निर्णायक कामगिरी बजावली. (वृत्तसंस्था)