क्वितोवा वि. बुचार्ड
By Admin | Updated: July 4, 2014 04:41 IST2014-07-04T04:41:09+5:302014-07-04T04:41:09+5:30
कॅनडाची २०वर्षीय टेनिसपटू इयुगेनी बुचार्ड हिने ऐतिहासिक कामगिरी करताना महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली़ जेतेपदासाठी तिला झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्वितोवाशी मुकाबला करावा लागेल.

क्वितोवा वि. बुचार्ड
लंडन : कॅनडाची २०वर्षीय टेनिसपटू इयुगेनी बुचार्ड हिने ऐतिहासिक कामगिरी करताना महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली़ जेतेपदासाठी तिला झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्वितोवाशी मुकाबला करावा लागेल.
उपांत्य फेरीच्या लढतीत बुचार्ड हिने तृतीय मानांकित रोमानियाच्या सिमोना हॅलेपचा ७-६, ६-१ अशा फरकाने धुव्वा उडविला़ एखाद्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी बुचार्ड कॅनडाची पहिलीच खेळाडू बनली आहे़ याआधी तीनवेळा तिने ग्रॅण्ड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. दीड तास रंगलेल्या या लढतीत बुचार्डचा दबदबा पाहायला मिळाला. सुरुवातीपासूनच तिने सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केले होते, परंतु हॅलेपही तिला तोडीस तोड उत्तर देत होती. त्यामुळे पहिला सेट एक तास रंगला. टाय ब्रेकरमध्ये रंगलेल्या या सेटमध्ये बुचार्डने बाजी मारत १-० अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र ३४ मिनिटांत बुचार्डने बाजी मारून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.
दुसऱ्या उपांत्य फेरीत झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्वितोवा हिने आपल्याच देशाच्या लुसी सफारोव्हाचा ७-६, ६-१ असा फडशा पाडताना अंतिम फेरीत प्रवेश केला़ ही लढत ९० मिनिटे चालली़ या लढतीत पेट्राने २३ विनर आणि ८ एस लगावले़ २०११ साली क्वितोवाने विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते आणि ती संधी पुन्हा तिच्यासाठी चालून आली आहे. (वृत्तसंस्था)