कुंटे, केळकर, गागरे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र
By Admin | Updated: July 20, 2016 17:51 IST2016-07-20T17:51:59+5:302016-07-20T17:51:59+5:30
ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकर आणि ग्रँडमास्टर शार्दूल गागरे या तीन महाराष्ट्राच्या बुद्धिबळपटूंनी आगामी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता साध्य केली आहे.

कुंटे, केळकर, गागरे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकर आणि ग्रँडमास्टर शार्दूल गागरे या तीन महाराष्ट्राच्या बुद्धिबळपटूंनी आगामी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता साध्य केली आहे.
नोएडा (नवी दिल्ली) येथे झालेल्या राष्ट्रीय चॅलेंजर स्पर्धेत ग्रॅँडमास्टर अभिजित कुंटेने चौथे, इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकरने पाचवे, तर ग्रँडमास्टर शार्दूल गागरेने आठवे स्थान संपादन केले. पहिले नऊ खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेला पात्र ठरले. एस. रवितेजाने सर्वाधिक दहा गुणांसह विजेतेपद जिंकले. अखेरच्या १३ व्या फेरीत त्याने के. सूर्यप्रणीताशी बरोबरी साधली. दुसऱ्या पटावर कुंटेने ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमला बरोबरीत रोखले. तिसऱ्या पटावर केळकरने धक्कादायक निकालाची नोंद केली. त्याने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा घेत ग्रँडमास्टर एस. एल. नारायणनला पराभूत करून सर्वांना आर्श्चयचकीत केले. केळकरचे एलो रेटिंग २३८०, तर नारायणनचे २५१५ आहे. या विजयामुळे केळकरला पाचव्या क्रमांकापर्यंत मजल मारता आली. गागरने संतू मोंडलला पांढऱ्या मोहऱ्यांसह हरविले. राष्ट्रीय स्पर्धा लखनौमध्ये आहे.
अंतिम क्रमवारी : एस. रवितेजा (१०), डी. बी. चंद्रप्रसाद, के . सूर्यप्रणीत, अभिजित कुंटे, अभिषेक केळकर (प्रत्येकी ९.५), एस. नितीन, आर. आर. लक्ष्मण, शार्दूल गागरे, अरविंद चिदंबरम (प्रत्येकी ९); प्रमुख निकाल : रवितेजा बरोबरी वि. सूर्यप्रणीत. कुंटेबरोबरी वि. अरविंद. केळकर विवि एस. एल. नारायणन. चंद्रप्रसाद विवि व्ही. विष्णू प्रसन्न. लक्ष्मण बरोबरी वि. तेजस बाकरे, शार्दूल विवि संतू मोंडल.