भारताकडून कोरिया पराभूत
By Admin | Updated: July 18, 2016 06:17 IST2016-07-18T06:17:34+5:302016-07-18T06:17:34+5:30
एकेरीची पहिली लढत खेळत असलेल्या बोपन्नाने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करीत रविवारी पहिल्या रिव्हर्स सिंगलमध्ये हांग चुंगचा पराभव केला;

भारताकडून कोरिया पराभूत
चंदीगड : गेल्या चार वर्षांत डेव्हिस कप स्पर्धेत एकेरीची पहिली लढत खेळत असलेल्या बोपन्नाने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करीत रविवारी पहिल्या रिव्हर्स सिंगलमध्ये हांग चुंगचा पराभव केला; पण योंग क्यू लिमने रामकुमार रामनाथनचा पराभव करीत भारताला आशिया ओशियाना ग्रुप ‘ए’च्या लढतीत दक्षिण कोरियाविरुद्ध ‘क्लीन स्वीप’ देण्यापासून रोखले.
साकेत मायनेनीच्या स्थानी बोपन्नाला खेळण्याची संधी देण्यात आली. एटीपी मानांकनात ६५५ व्या स्थानी असलेल्या चुंगविरुद्ध ३-६, ६-४, ६-४ ने विजय मिळवताना बोपन्नाला संघर्ष करावा लागला. शुक्रवारी संघर्षपूर्ण खेळ करणारा मायनेनी अद्याप पूर्णपणे फिट नाही.
बोपन्ना यापूर्वी डेव्हिस कप स्पर्धेत २०१२ मध्ये उझबेकिस्तानच्या सरवर इकरामोव्हविरुद्ध खेळला होता. तो त्या लढतीचा पाचवा सामना होता आणि त्यात बोपन्नाने विजय मिळवला होता.
भारताने पहिल्या दिवशी एकेरीच्या दोन्ही लढती आणि शनिवारी दुहेरीची लढत जिंकत विजयी आघाडी घेतली होती. त्यामुळे रविवारी खेळले जाणारे परतीचे एकेरीचे सामने केवळ औपचारिकता पूर्ण करणारे होते. रामकुमारला पाचव्या लढतीत लिमविरुद्ध ३-६, ६-४, ६-७ ने पराभव स्वीकारावा लागला. कोरियन संघाला या लढतीत १-४ ने पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांनी भारताविरुद्ध संघर्षपूर्ण खेळ केला. भारत आता १६ देशांच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्यासाठी तिसऱ्यांदा प्रयत्न करणार आहे. आता भारताला सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या लढतीतील प्रतिस्पर्ध्यासाठी विश्व गटातील सामन्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सेनेमध्ये कार्यरत असलेल्या लिमला पहिल्या लढतीत मायनेनीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पाठीच्या दुखापतीतून सावरलेल्या लिमने रामनाथचा पराभव केला. त्याआधी, खेळल्या गेलेल्या लढतीत पहिला सेट गमाविणारा बोपन्ना दुसऱ्या सेटमध्ये ०-३ ने पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने चमकदार खेळ करीत चुंगचा पराभव केला. (वृत्तसंस्था)
>युवांना फिटनेसमध्ये सुधारणा करण्याची गरज : बोपन्ना
रोहन बोपन्नाने युवा भारतीय खेळाडूंना आव्हानाला सामोरे जाण्यासाठी फिटनेस राखण्याचा सल्ला दिला. साकेत मायनेनीला फिटनेसच्या अभावामुळे रविवारच्या लढतीत खेळता आले नाही. त्यामुळे त्याच्या स्थानी बोपन्नाला खेळावे लागले.
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीनंतर मायनेनीला स्नायूच्या दुखापतीने त्रस्त केले. त्यामुळे बोपन्नाला चार वर्षांनंतर डेव्हिस कप स्पर्धेत एकेरीची लढत खेळावी लागली. त्याने डावखुऱ्या चुंग होंगविरुद्ध विजय मिळवत भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. केवळ मायनेनीच नाही, तर कोरियाच्या योंग कु लिम व सियोंग चान होंग यांनाही येथील वातावरणाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना बोपन्ना म्हणाला, ‘‘युवा खेळाडूंना पाच सेटपर्यंत खेळायचे असेल, तर फिटनेस राखणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागेल. सुदैवाने आम्ही पहिल्याच दिवशी २-० अशी आघाडी घेण्यात यशस्वी ठरलो. त्यामुळे शनिवारी दुहेरीच्या लढतीत सरशी साधत विजयी आघाडी घेता आली. जर, शनिवारी पराभव स्वीकारावा लागला असता, तर आज, रविवारी यापैकी एका खेळाडूला खेळावेच लागले असते.’’