कोलकाता चेन्नईवर स्वार
By Admin | Updated: May 1, 2015 01:30 IST2015-05-01T01:30:45+5:302015-05-01T01:30:45+5:30
कोलकाता नाईट रायडर्सने बलाढ्या चेन्नई सुपर किंग्जने दिलेले १६६ धावांचे विजयी लक्ष्य २ चेंडू व ७ गडी राखून १६९ धावा करीत पार केले.

कोलकाता चेन्नईवर स्वार
नाईट रायडर्स ७ गडी राखून विजयी : ब्रॅड हॉग, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल विजयाचे शिल्पकार
कोलकाता : ब्रॅड हॉगची (४ बळी) भेदक गोलंदाजी, रॉबिन उथप्पाची (५८ चेंडूत ८० धावा) आक्रमक फलंदाजी व आंद्रे रसेलच्या (३२ चेंडूत, ५९ धावा व २ बळी) अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने बलाढ्या चेन्नई सुपर किंग्जने दिलेले १६६ धावांचे विजयी लक्ष्य २ चेंडू व ७ गडी राखून १६९ धावा करीत पार केले.
कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवीत ब्रॅड हॉगने २९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेत चेन्नईची भक्कम फलंदाजी मोडून काढली. त्याला आंद्रे रसेलने २० धावांत २ बळी घेत सुरेख साथ दिली. चेन्नईच्या १६५ धावांच्या अव्हानाला प्रत्युत्तर देताना कोलकाता नाईट रायडर्सचा गौतम गंभीर (१६ चेंडूत १९) व रॉबिन उथप्पाने ३३ धावांची सलामी दिली. गंभीर मोहित शर्माच्या गोलंदाजीवर रोनित मोरेकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ मनीष पांडे (३) पी. नेगीच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाकडे झेल देऊन परतला. सुर्यकुमार यादव (२) देखील मोरे च्या गोलंदाजीवर ड्वेन ब्राव्होकडे झेल देऊन परतला. त्यामुळे कोलकाताची अवस्था २ बाद ५४ वरुन ३ बाद ५७ अशी झाली. सामन्याचे पारडे चेन्नईकडे झुकते की काय, असे वाटत असतानाच उथप्पा व रसेल यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत चौफेर फटकेबाजी केली. उथप्पाने ७ चौकार व एका षटकाराच्या साह्याने ५० चेंडूत ८० धावा तडकावल्या. तर रसेलने ५ चौकार व ४ षटकारांच्या साह्याने अवघ्या ३२ चेंडूंत ५९ धावांची घणाघाती खेळी करीत संघाचा विजय साकार केला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर याने क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सार्थक ठरविला. त्यांच्या ब्रॅड हॉगने २९ धावा देऊन ब्रॅँडन मॅक्युलम (३२), फाफ डुप्लेसिस (२०), रवींद्र जडेजा (२४) व पवन नेगी (२७) हे महत्त्वाचे फलंदाज तंबूत परताविले. त्याच्यासह आंद्रे रसेलने ड्वेन ब्रोव्हो (३०) आणि मोहित शर्मा (०) या दोघांना बाद केले. यासह पॅट कमिन्स, उमेश यादव पीयूष चावला यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. चेन्नई सुपर किंग्जचे ड्वेन स्मिथ (०), सुरेश रैैना (८), मेहंद्रसिंह धोनी (१) हे दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत.
चेन्नई सुपरकिंग्ज : ड्वेन स्मिथ झे. टेन डोएशे गो. कमिन्स ०, ब्रॅँडम मॅक्युलम पायचित गो. हॉग ३२, सुरेश रैैना झे. चावला गो. उमेश यादव ८, फाफ ड्युप्लेसिस यष्टीचित गो. हॉग २०, ड्वेन ब्रोव्हा त्रि. गो. रसेल ३०, महेंद्रसिंह धोनी त्रि. गो. चावला १, रवींद्र जडेजा झे. कमिन्स गो. हॉग २४, पवन नेगी त्रि. गो. हॉग २७, मोहित शर्मा झे. उथप्पा गो. रसेल ०, आशिष नेहरा नाबाद १, रोनित मोरे २; अवांतर : २०; एकूण : ९ बाद १६५; गोलंदाजी : पॅट कमिन्स ४-०-५४-१, उमेश यादव २-०-१६-१, पीयूष चावला ४-०-२१-१, ब्रॅड हॉग ४-०-२९-४, युसूफ पठाण २-०-११-०, आंद्रे रसेल ४-०-२०-२.
कोलकाता नाईट रायडर्स : रॉबनि उथप्पा नाबाद ८०, गौतम गंभीर झे. मोरे गो. शर्मा १९, मनीष पांडे झे. जडेजा गो. नेगी ३, सूर्यकुमार यादव झे. ब्राव्हो गो. मोरे २, आंद्रे रसेल नाबाद ५९, अवांतर : ६; एकूण : ३ बाद १६९; गोलंदाजी : मोहित शर्मा ४-०-२२-१, आशिष नेहरा ४-०-३६-०, पवन नेगी ४-०-२३-१, रोनित मोरे ३.५-०-३५-१, रवींद्र जडेजा २-०-२५-०, ड्वेन ब्राव्हो २-०-२७-०.