कोलकाता-पंजाब ‘आमने-सामने’
By Admin | Updated: May 27, 2014 06:12 IST2014-05-27T06:12:40+5:302014-05-27T06:12:40+5:30
यपीएलच्या सातव्या पर्वात कामगिरीत सातत्य राखणार्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला मंगळवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे

कोलकाता-पंजाब ‘आमने-सामने’
कोलकाता : आयपीएलच्या सातव्या पर्वात कामगिरीत सातत्य राखणार्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला मंगळवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. निराशाजनक सुरुवातीनंतर स्पर्धेत छाप सोडण्यात यशस्वी ठरलेला कोलकाता नाईट रायडर्स व किंग्ज इलेव्हन संघांदरम्यान खेळल्या जाणार्या या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सहा पर्वांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघ यंदाच्या मोसमात सर्वोत्तम ठरला आहे. ग्लेन मॅक्सवेल व डेव्हिड मिलर यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पहिल्या सात सामन्यांत केवळ दोन विजय मिळविणार्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे चाहते निराश झाले होते; पण त्यानंतर केकेआर संघाने चमकदार कामगिरी करीत प्ले आॅफमध्ये स्थान मिळविले. युसूफ पठाणच्या (७२ धावा, २२ चेंडू) आक्रमक खेळीच्या जोरावर केकेआर संघाने नेटरनरेटमध्ये सुधारणा करीत दुसर्या स्थानावर झेप घेतली. केकेआर संघाने आतापर्यंत विक्रमी सलग सात विजय मिळविले आहेत. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर पंजाब संघाचे पारडे वरचढ भासत असले तरी सूर गवसलेल्या केकेआर संघाला रोखणे सोपे नाही, याची पंजाब संघाला चांगली कल्पना आहे, त्यामुळे जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखालील पंजाब संघ केकेआर संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. उभय संघ चषकापासून केवळ दोन विजय दूर आहेत; पण क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला तरी पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पराभूत संघाला दुसर्या क्वालिफायरमध्ये संधी मिळणार आहे. सूर गवसला म्हणजे युसूफला रोखणे शक्य नाही, याची प्रचिती आलेली आहे. जगातील अव्वल वेगवान गोलंदाज डेल स्टेनचाही युसूफपुढे निभाव लागला नाही. युसूफने त्याच्या षटकात २६ धावा फटकावल्या. केकेआरला दुसरे स्थान पटकावण्यासाठी १५.२ षटकांत १६१ धावांचे लक्ष्य गाठणे आवश्यक होते. युसूफच्या आक्रमक खेळीच्या जोरावर केकेआर संघाने हे लक्ष्य १४.२ षटकांत पूर्ण केले. युसूफच्या खेळीतून प्रेरणा घेताना मुंबई इंडियन्सच्या कोरे अॅण्डरसनने रविवारी ४४ चेंडूंमध्ये ९५ धावांची खेळी करीत मुंबई इंडियन्सला नेटरनरेटच्या आधारावर क्वालिफायरमध्ये स्थान मिळवून दिले. राजस्थानविरुद्धच्या लढतीत मॅक्सवेलला विश्रांती देण्यात आली होती. मॅक्सवेलला गेल्या तीन डावांमध्ये केवळ १६ धावा फटकावता आल्या. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध रविवारी मॅक्सवेल खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. पंजाब संघात मध्यफळीत डेव्हिड मिलर, मनन व्होरा, कर्णधार बेली व रिद्धिमान साहा यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. फिरकीपटूंची कामगिरी पंजाब संघासाठी चिंतेचा विषय आहे. ऋषी धवन व अक्षय पटेल यांना विशेष छाप सोडता आलेली नाही. मंगळवारच्या लढतीत मुरली कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजीत पंजाब संघातर्फे यापूर्वीच्या सर्व सत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणार्या व दोन हजारपेक्षा अधिक धावा फटकावणार्या शॉन मार्शवर मॅक्सवेल व मिलर यांच्या कामगिरीमुळे बाहेर बसण्याची वेळ आली आहे. यंदाच्या मोसमात पंजाब संघाला मुंबई इंडियन्सव्यतिरिक्त केकेआर संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. गृहमैदानावर खेळताना केकेआर संघाचे मनोधैर्य उंचावलेले राहणार आहे. केकेआर संघाची गोलंदाजी व फलंदाजीची बाजू मजबूत आहे. १४ सामन्यांत ६१३ धावा फटकावणार्या रॉबिन उथप्पाकडे सध्या परपल कॅप आहे तर कर्णधार गौतम गंभीरने ३११ धावा फटकावल्या आहेत. मध्यफळीत शाकिब, रॅन टेन डोएश्चे व युसूफ आहेत. (वृत्तसंस्था)