कोलकात्याचा सनरायझर्सवर विजय

By Admin | Updated: May 5, 2015 01:00 IST2015-05-05T01:00:03+5:302015-05-05T01:00:03+5:30

: कोलकता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी केलेल्या ‘टाईट’ गोलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादपुढील १६८ धावांचे शक्य आव्हान अशक्यप्राय झाले अन्

Kolkata beat Sunrisers | कोलकात्याचा सनरायझर्सवर विजय

कोलकात्याचा सनरायझर्सवर विजय

कोलकाता : कोलकता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी केलेल्या ‘टाईट’ गोलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादपुढील १६८ धावांचे शक्य आव्हान अशक्यप्राय झाले अन् कोलकात्याने ३५ धावांनी बाजी मारली. सनरायझर्सचा संघ २० षटकांत ९ बाद १३२ धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. कोलकात्याकडून उमेश यादव आणि ब्रॅड हॉग यांनी प्रत्येकी दोन बळी घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सनरायझर्सची सुरुवात धक्कादायक झाली. उमेश यादवने सलामीवीर तसेच कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा (४) पहिल्याच षटकात त्रिफळा उडवला. त्यानंतर याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर यादवने नमन ओझालाही (०) तंबूत पाठवले. यादवच्या सलग दोन धक्क्यांनी सनरायझर्स हादरले. त्यानंतर शिखर धवन (१५) आणि हेनरिक्स या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र ही जोडीसुद्धा तग धरू शकली नाही. हॉगच्या चेंडूवर धवन पांडेकरवी झेलबाद झाला. त्यानंतर इयान मॉर्गन (५), विहारी (६), विपुल शर्मा (१) हे झटपट बाद झाले. त्यामुळे सनरायझर्स १२ षटकांत ६ बाद ६९ अशा संकटात सापडले. हेन्रिक्स (४१) आणि कर्ण शर्मा (३२) यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही यश आले नाही.
त्याआधी, ‘होमग्राउंड’वर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने मनीष पांडे (३३) आणि रॉबिन उथप्पा-गौतम गंभीरची अर्धशतकी भागीदारी यांच्या जोरावर ७ बाद १६७ धावा केल्या. आयपीएलमधील ३८व्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा या जोडीने आव्हान दिले. त्यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी या जोडीने ५७ धावांची भागीदारी केली. २३ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ३१ धावा करणाऱ्या गौतम गंभीरला कर्ण शर्माने मॉर्गनकरवी झेलबाद केले. गौतम परतताच रॉबिनलाही कर्ण शर्मानेच तंबूत पाठवले. शर्माच्या या दोन धक्क्यांमुळे कोलकाता नाईट रायडर्सची धावगती मंदावली. एका बाजूने मनीष पांडेने (३३) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पांडेसुद्धा दुर्दैवीपणे धावबाद झाला. त्या वेळी कोलकाता संघ ५ बाद १११ अशा स्थितीत होता. मध्यमफळीत युसूफ पठाणने अवघ्या १९ चेंडंूत ४ चौकारांच्या मदतीने ३० धावांची आक्रमक खेळी केल्यामुळे कोलकात्याला १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. जोनाथन बोथाने १२, तर सूर्यकुमार यादवने ६ धावा केल्या. सनरायझर्सकडून भुवनेश्वर कुमार आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन, तर प्रवीण कुमार व विपुल शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Web Title: Kolkata beat Sunrisers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.