अटीतटीच्या लढतीत कोलकाताचा दिल्लीवर रोमहर्षक विजय
By Admin | Updated: April 17, 2017 20:09 IST2017-04-17T19:55:13+5:302017-04-17T20:09:34+5:30
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 4 विकेट आणि 1 चेंडू राखून पराभव केला.

अटीतटीच्या लढतीत कोलकाताचा दिल्लीवर रोमहर्षक विजय
>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. 17 - अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 4 विकेट आणि 1 चेंडू राखून पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकातासाठी सामन्याचा हिरो ठरला तो मनिष पांडे. मनिष पांडेने नाबाद 69 धावांची खेळी केली. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात 3 चेंडूत 8 धावांची आवश्यकता असताना मनिषने अमित मिश्राला षटकार ठोकत विजयाची मालिका खंडीत होणार नाही याची काळजी घेतली. या विजयासोबत अव्वल स्थानावर असलेल्या मुंबईची कोलकाताने बरोबरी केली. दोन्ही संघांचे 8 गुण झाले आहेत.
यापुर्वी दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 7 विकेटवर 168 धावा केल्या. ऋषभ पंत 16 चेंडूत शानदार 38 धावा (2 चौकार, 4 षटकार) करून तंबूत परतला. पंतने 17 व्या षटकात उमेश यादव याला चांगलेच झोडपले. या षटकात त्याने 4 षटकार आणि 2 चौकार ठोकून 26 धावा केल्या. दिल्ली डेअरडेव्हिल्सने आज शहबाज नदीमच्या ऐवजी पेस बॉलर मोहम्मद शमीला संधी दिली. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या सलामीची जोडी संजू सॅमसन आणि सॅम बिलिंग्जने झंझावाती सुरुवात केली. पण, कोलकात्याचा पेस बॉलर काउल्टर नाइलने सॅमसन आणि बिलिंग्जला ब्रेक लावला. 7 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नाइलने सॅम बिलिंग्ज आऊट केले. सॅमसनने 39 धावांची खेळी केली. यात सात खणखणीत चौकारांचा समावेश होता. तर बिलिंग्जने 21 धावा ठोकल्या. करुण नायर यावेळी धावांसाठी झगडताना दिसला. नायरने 27 चेंडूत 21 धावा केल्या. कुल्टर नायलच्या गोलंदाजीवर तो क्लीनबोल्ड झाला. ख्रिस मॉरिसनेही अखेरच्या दोन षटकांमध्ये तीन चौकार लगावत 9 चेंडूत नाबाद16धावांची खेळी साकारली.