कोहली, एबीचा धडाका
By Admin | Updated: May 17, 2016 07:06 IST2016-05-17T04:58:54+5:302016-05-17T07:06:57+5:30
नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने दणदणीत विजय मिळवताना कोलकाता नाईट रायडर्सला ९ विकेटस्ने लोळवले

कोहली, एबीचा धडाका
कोलकाता : मोक्याच्या वेळी फॉर्ममध्ये आलेल्या धडाकेबाज ख्रिस गेलने केलेल्या आक्रमक सुरुवातीनंतर कर्णधार विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स यांच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने दणदणीत विजय मिळवताना कोलकाता नाईट रायडर्सला ९ विकेटस्ने लोळवले. या धमाकेदार विजयासह बेंगळुरुने प्ले आॅफच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात बेंगळुरुने नाणेफेक जिंकून यजमान कोलकाताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. कर्णधार गौतम गंभीर व मनीष पांडे यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ५ बाद १८३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. यानंतर बंगलोरने सहज बाजी मारताना केवळ ख्रिस गेलच्या मोबदल्यात ८ चेंडू राखून दणदणीत बाजी मारली.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून खराब फॉर्मशी झगडणारा गेल या सामन्यात लौकिकाप्रामाणे खेळला. त्याने ३१ चेंडूत ५ चौकार व ४ षटकार ठोकून ४९ धावांचा तडाखा दिला. सुनील नरेनने पायचित पकडल्याने गेलचे अर्धशतक एका धावाने हुकले. यानंतर कोहली आणि डिव्हिलियर्स यांनी नाबाद ११५ धावांची भागीदारी करून संघाचा विजय साकारला. कोहलीने ५१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारासह नाबाद ७५ धावा कुटल्या, तर डिव्हिलियर्सने ३१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५९ धावांचा तडाखा दिला.
तत्पूर्वी, गंभीर व पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करून कोलकाताला सावरले. गंभीरने ३४ चेंडूत ७ चौकारांसह ५१ धावा केल्या, तर पांडे ३५ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ५० धावा काढून परतला. बेंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
सलामीवीर उथप्पाला (२) अब्दुल्लाने झटपट माघारी परतवत बेंगळुरूला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार गंभीर व मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करीत डाव सावरला. आंद्रे रसेल (३९) व शाकिब (१८) यांनी सहाव्या विकेटासाठी २८ चेंडूंमध्ये ५८ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला आव्हानात्मक मजल मारुन दिली. बेंगळुरूतर्फे अरविंदने दोन तर अब्द्ुल्ला व चहल यांनी प्रत्येक एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : २० षटकात ५ बाद १८३ धावा (गौतम गंभीर ५१, मनीष पांडे ५०, आंद्रे रसेल नाबाद ३९, श्रीनाथ अरविंद २/४१) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु : १८.४ षटकात १ बाद १८६ धावा (विराट कोहली नाबाद ७५, एबी डिव्हिलियर्स नाबाद ५९, ख्रिस गेल ४९, सुनील नरेन १/३४)