केकेआरचा ‘प्ले-आॅफ’ पक्का
By Admin | Updated: May 23, 2014 01:54 IST2014-05-23T01:54:55+5:302014-05-23T01:54:55+5:30
गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत बंगळुरू संघाचा ३० धावांनी पराभव करीत आयपीएलच्या सातव्या पर्वात प्ले-आॅफमध्ये स्थान मिळविले.

केकेआरचा ‘प्ले-आॅफ’ पक्का
कोलकाता : रॉबिन उथप्पा (८३) व शाकिब-अल-हसन (६०) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर फिरकीपटू सुनील नरेनच्या (४-२०) अचूक मार्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आज, गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत बंगळुरू संघाचा ३० धावांनी पराभव करीत आयपीएलच्या सातव्या पर्वात प्ले-आॅफमध्ये स्थान मिळविले. या विजयासह केकेआर संघाने १३ सामन्यांत १६ गुणांची कमाई केली. कोलकाता नाईट रायडर्स किंग्ज इलेव्हन पंजाब व चेन्नई सुपरकिंग्ज या संघांपाठोपाठ प्ले-आॅफमध्ये स्थान मिळविणार तिसरा संघ ठरला. १३ सामने खेळणार्या बंगळुरू संघाला आज आठवा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांच्या प्ले-आॅफ फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या. केकेआर संघाने ४ बाद १९५ धावांची दमदार मजल मारली आणि प्रतिस्पर्धी बंगळुरू संघाचा डाव ५ बाद १६५ धावांत रोखला. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरू संघातर्फे योगेश ताकवाले (४५) व विराट कोहली (३८) व युवराज सिंग (२२) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. सुनील नरेनने २० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेत बंगळुरू संघाचा डाव रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उमेश यादवने आक्रमक सलामीवीर ख्रिस गेलला (०६) झटपट माघारी परतवत केकेआर संघाला वर्चस्व मिळवून दिले. त्याआधी, फॉर्मात असलेला रॉबिन उथप्पा व शाकिब-अल-हसन यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावित तिसर्या विकेटसाठी केलेल्या १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने ४ बाद १९५ धावांची दमदार मजल मारली. उथप्पाने ५१ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व १ षट्काराच्या सहाय्याने नाबाद ८३ धावांची खेळी केली. शाकिबने ३८ चेंडूंमध्ये ६० धावा फटकाविल्या. त्यात ५ चौकार व ३ षट्कारांचा समावेश आहे. निराशाजनक सुरुवातीनंतर या जोडीने डाव सावरला व केकेआरला दमदार मजल मारून दिली. युसूफ पठाणने (२२) सूर गवसल्याचे संकेत दिले, पण धावबाद झाल्यामुळे त्याची खेळी संपुष्टात आली. उथप्पाने चहलच्या गोलंदाजीवर षट्कार ठोकल्यानंतर अबू नाचिमच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत आयपीएलच्या सातव्या पर्वात प्रथमच आॅरेंज कॅपचा मान मिळविला. उथप्पा आयपीएलच्या एका सत्रात ५०० धावांचा पल्ला पार करणारा २४ वा फलंदाज ठरला. त्यानंतर ३४ चेंडूंमध्ये त्याने या मोसमातील पाचवे अर्धशतक झळकाविले. (वृत्तसंस्था)