केकेआर सातत्य टिकविणार?
By Admin | Updated: May 2, 2015 00:02 IST2015-05-02T00:02:34+5:302015-05-02T00:02:34+5:30
चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या विजयामुळे उत्साहित कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल-८ मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुला नमवित विजयी सातत्य टिकविण्याचे आव्हान असेल.

केकेआर सातत्य टिकविणार?
बेंगळुरू : चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या विजयामुळे उत्साहित कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल-८ मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुला नमवित विजयी सातत्य टिकविण्याचे आव्हान असेल.
कालच्या विजयासह केकेआर गुण तालिकेत चार विजय आणि दोन पराभवांसह तिसऱ्या स्थानावर आला. एक सामना पावसात वाहून गेला. दुसरीकडे आरसीबी सात सामन्यात तीन विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. सीएसकेविरुद्धचा विजय केकेआरसाठी उत्साह वाढविणारा ठरला. या उत्साहार आरसीबीला नमविण्याचे त्यांना कसब करावे लागेल. कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या अपयशानंतरही आरसीबीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २०० धावा उभारल्या होत्या.
रॉबिन उथप्पाला सूर गवसणे केकेआरसाठी शुभसंकेत आहेत. त्याने चेन्नईविरुद्ध नाबाद ८० आणि आंद्रे रसेल याने नाबाद ५५ धावा ठोकल्या होत्या. पण कर्णधार गंभीर आणि युसूफ पठाणसह अनेक फलंदाज अपयशी ठरले हा केकेआरसाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत मात्र ब्रॅड हॉग हुकमी एक्का ठरला. त्याने काल चार बळी घेतले.
आरसीबीची सुरुवात चांगली झाली नव्हती पण राजस्थान रॉयल्सला अहमदाबादमध्ये आणि डेअरडेव्हिल्सला कोटलावर नमवित पुनरागमन केले. पण घरच्या मैदानावरील अपयशाने चिंता वाढली. गेल, कोहली आणि डिव्हिलियर्सच्या उपस्थितीत फलंदाजी भक्कम आहे पण गोलंदाजी कमकुवत वाटते. आॅस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कच्या नेतृत्वात आरसीबीच्या माऱ्याने दिल्लीला ९५ धावांत लोळविले होते. स्टार्कला वरुण अॅरोन आणि डेव्हिड वीज यांची साथ लाभली असून फिरकीची जबाबदारी यजुवेंद्र चहल याच्यावर असेल. (वृत्तसंस्था)