केकेआरला सुपरजायन्टस्चा धोका
By Admin | Updated: May 14, 2016 01:59 IST2016-05-14T01:59:35+5:302016-05-14T01:59:35+5:30
प्ले आॅफच्या चढाओढीबाहेर झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायन्टस्ला आयपीएल नऊमध्ये आता गमविण्यासारखे काहीच नाही. इतर संघांचे गणित चुकविण्याचे काम मात्र हा संघच करू शकतो

केकेआरला सुपरजायन्टस्चा धोका
कोलकाता : प्ले आॅफच्या चढाओढीबाहेर झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायन्टस्ला आयपीएल नऊमध्ये आता गमविण्यासारखे काहीच नाही. इतर संघांचे गणित चुकविण्याचे काम मात्र हा संघच करू शकतो. आज, शनिवारी होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला नेमक्या याच गोष्टीपासून सावध रहावे लागेल.
मागच्या सामन्यात हैदराबादकडून पराभूत झालेला धोनीचा पुणे संघ स्पर्धेबाहेर पडलेला पहिलाच संघ आहे. या संघाला आपल्या वाट्याचे अद्याप तीन सामने खेळायचे आहेत. दुसरीकडे पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर केकेआर संघ नव्या जोमाने खेळणार आहे. केकेआरला गुजरातकडून झालेल्या पराभवाचा मोठा फटका बसला. हा संघ गुणतालिकेत खाली घसरला आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये केकेआरला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठविणारा फिरकी गोलंदाज सुनील नारायण यंदा फॉर्ममध्ये नाही. आतापर्यंत सहा सामन्यांत त्याला केवळ सहा बळी मिळाले. नेटस्वर घाम गाळणारा नारायण ब्रॅड हॉगचे स्थान घेण्याची शक्यता असल्याने विकेट फिरकीला अनुकूल बनविण्यात आली आहे. हा डाव मात्र केकेआरवर देखील उलटण्याची शक्यता वर्तविली जात आहे, कारण पुणे संघात आर. अश्विन आणि मुरुगन अश्विन, झम्पा असे तीन फिरकी गोलंदाज आहेत. प्ले आॅफमध्ये जाण्यासाठी केकेआरला चारपैकी २ सामने जिंकावे लागतील.
पुण्याचा कर्णधार धोनी आश्चर्यकारक निर्णयामुळे टीकेचे लक्ष्य ठरला. दोन षटकांत २२ धावांची गरज असताना सर्वोत्कृष्ट फिनिशर असणारा धोनी बचावात्मक खेळला, त्यामुळे हैदराबादला चार धावांनी विजय शक्य झाला होता. धोनीने दहा सामन्यांत २१२ धावा केल्या. शिवाय अश्विनचा देखील त्याने संपूर्ण वापर केला नाही. अश्विनला अनेक सामन्यांत संपूर्ण चार षटके गोलंदाजी दिली नाही. (वृत्तसंस्था)