केकेआरला जाणवणार नरेनची उणीव
By Admin | Updated: April 26, 2015 01:33 IST2015-04-26T01:33:37+5:302015-04-26T01:33:37+5:30
गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध दोन हात करताना हुकमी एक्का जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरेन याची उणीव जाणवणार आहे.

केकेआरला जाणवणार नरेनची उणीव
कोलकाता : गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध दोन हात करताना हुकमी एक्का जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरेन याची उणीव जाणवणार आहे. नरेनच्या संशयास्पद गोलंदाजी शैलीबाबत पुन्हा एकदा तक्रार झाली.
नरेनला बीसीसीआय आणि आयसीसीच्या चेन्नईतील मान्यताप्राप्त केंद्रात बायोमेकॅनिकल चाचणीस सामोरे जावे लागणार आहे. नरेनच्या अनुपस्थितीत केकेआरला मानसिक धक्का बसला असावा. मागच्या सामन्यात केकेआरचा डकवर्थ- लुईस नियमाच्या आधारे सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झाला होता. दुसरीकडे पाच सामने जिंकल्यानंतर पुढचे दोन्ही सामने गमविणाऱ्या राजस्थानला विजयी वाटेवर परतण्याचे आव्हान आहे.
नरेनच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला केकेआर संघ उद्याच्या लढतीत त्याला खेळविण्याची जोखीम पत्करणार नाही. नरेनला पर्याय नाही, असे मत गौतम गंभीरने देखील व्यक्त केले. नरेनने आयपीएलच्या तीन पर्वातील ५२ सामन्यांत ६७ गडी बाद केले. २०१२ आणि २०१४ च्या जेतेपदात त्याचा मोलाचा वाटा होता. यंदा संघाने खेळलेल्या पाच सामन्यांत नरेन फारसा प्रभावी ठरलेला नाही. त्याने प्रत्येकवेळी चार षटके गोलंदाजी केली, पण दोनच गडी बाद करू शकला. हैदरबादविरुद्ध त्याने चक्क ३८ धावा मोजल्या होत्या.
महापालिका निवडणुकांमुळे केकेआर संघ ईडनवर १५ दिवसानंतर खेळणार आहे. केकेआरने दुसरा प्लान तयार ठेवला असून, फिरकीची जबाबदारी सी. करिअप्पा, पीयूष चावला, कुलदीप यादव, युसूफ पठाण, योहान बोथा किंवा ब्रॅड हॉग यांच्यापैकी कुणावरही सोपविली जाऊ शकते. केकेआरचे स्थानिक सामने ९ मे रोजी संपणार आहेत. फलंदाजीत मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव हे सर्वजण मोठी खेळी करू शकले नाहीत. युसूफ पठाण कधीकधी चमक दाखवितो.
राजस्थान रॉयल्सकडे अजिंक्य रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ हे धडाकेबाज फलंदाज आहेत. कर्णधार शेन वॉटसनदेखील धावा काढतो. गोलंदाजीत दीपक हुड्डा धडकी भरवित आहे. वेगवान माऱ्याची जबाबदारी ख्रिस मॉरिस आणि जेम्स फॉल्कनर यांच्यावर असेल.
गेल्या दोन सामन्यांतील पराभवानंतरही रॉयल्सचे अव्वल स्थान कायम आहे. पण, अन्य संघांच्या तुलनेत हा संघ दोन सामने अधिक खेळला हे विशेष. (वृत्तसंस्था)
राजस्थान रॉयल्स : शेन वॉटसन (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुड्डा, धवल कुलकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवाटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टिम साऊदी, विक्रमजीत मलिक, ख्रिस मॉरिस, ज्युआन थेरोन, बरिंदरसिंग सरन, दिनेश सांळुंके, सागर त्रिवेदी, प्रदीप साहू.
कोलकाता नाईट राईडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, पीयूष चावला, सुनील नरेन, उमेश यादव, मोर्नी मोर्केल, रेयॉन टेन डोयशे, अझहर मेहमूद, योहान बोथा, पॅट कमिन्स, ब्रॅड हॉग, केसी करियप्पा, आदित्य गढवाल, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, सुमित नरवाल, वीर प्रतापसिंग आणि वैभव रावल.