‘नॉक आऊट’ साठी खेळणार केकेआर-बॅँगलोर
By Admin | Updated: May 22, 2014 05:32 IST2014-05-22T05:32:58+5:302014-05-22T05:32:58+5:30
घरच्या मैदानावर विजय मिळविल्याने उत्साहित असलेल्या कोलकता नाईट रायडर्सच्या नजरा गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरविरुद्ध विजय नोंदवून आयपीएल-७ च्या प्ले आॅफ मध्ये धडक देण्याकडे असतील.

‘नॉक आऊट’ साठी खेळणार केकेआर-बॅँगलोर
कोलकता : घरच्या मैदानावर विजय मिळविल्याने उत्साहित असलेल्या कोलकता नाईट रायडर्सच्या नजरा गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरविरुद्ध विजय नोंदवून आयपीएल-७ च्या प्ले आॅफ मध्ये धडक देण्याकडे असतील. कोलकता आणि बॅँगलोर यांच्यात होणारा हा सामना ‘नॉक आऊट’चे युद्ध मानले जात आहे. बॅँगलोरसाठी हा अखेरचा सामना असेल. जिंकल्यास पुढील आशा कायम राहतील, पराभूत झाल्यास संघ स्पर्धेबाहेर होईल. कोलकताने विजय मिळविल्यास प्ले आॅफमध्ये पोहोचेल. पराभव झाल्यास अखेरचा सामना कुठल्याही स्थितीत जिंकावाच लागेल. केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर याला विजयी लय कायम ठेवायची असून, एक सामना उरला असताना प्ले आॅफमध्ये दाखल व्हायचे आहे. १२ पैकी सात विजय नोंदविणारा हा संघ चौथ्या स्थानावर आहे. बॅँगलोरवरील विजय त्यांचे स्थाननिश्चिती करणारा ठरेल. दुसरीकडे आरसीबीलादेखील प्ले आॅफमध्ये दाखल होण्याची आशा आहे. त्यासाठी अन्य संघांच्या कामगिरीवर या संघाला विसंबून राहावे लागणार आहे. मागच्या सामन्यात हैदराबाद पराभूत झाल्याने बॅँगलोरची स्थिती कमकुवत झाली. आरसीबीने १२ पैकी पाच सामने जिंकले. केकेआरच्या कामगिरीवर नजर टाकल्यास गंभीरचा संघ जबर फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी व गोलंदाजी संतुलित असून, मागच्या विजयाने आत्मविश्वास दुणावला. सलामीचा रॉबिन उथप्पा संघाची मोठी ताकद मानला जातो. चेन्नईविरुद्ध त्याने ६७ धावा ठोकल्या. १२ सामन्यांत त्याच्या सर्वाधिक ४८९ धावा आहेत. गंभीर, शकिब अल हसन, मनीष पांडे आणि आॅफ राउंडर युसूफ पठाण हे चांगले फलंदाज आहेत. (वृत्तसंस्था) गोलंदाजीत शाकिब शिवाय सुनील नारायण महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने १२ सामन्यांत १६ गडी बाद केले. पीयूष चावला, पॅट कमिन्स आणि रेयॉन टेन डोएशे हेदेखील गोलंदाजीत उपयुक्त आहेत. बॅँगलोर संघात युवराज, कोहली, डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, पार्थिव पटेल हे चांगले फलंदाज आहेत. युवी ‘षटकार किंग’ म्हणून पुढे आला, तर डिव्हिलियर्सने सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीने उद्या बॅटचा दम दाखविल्यास सामना फिरविण्याची ताकद त्याच्या खेळीत असेल.(वृत्तसंस्था)